Latest

फक्त चव आणि वास नव्हे, तर आरोग्यदायी कढीपत्ता ! १७ गुणकारी फायदे माहीत आहेत का ?

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय पदार्थांमध्ये कढीपत्ता वापरला जातो. त्यामुळे पदार्थाला चव येतेच, पण वासही येतो. अर्थात केवळ चव आणि वास नव्हे तर कढीपत्त्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुण असतात. ते जाणून घेणे गरजेचे आहे. कढीपत्त्यामुळे रक्‍तातील एचडीएल म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवून एकूण कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित करते. हृदयाशी निगडित विकास दूर ठेवण्यात मदत होते. त्यामुळेच कढीपत्ता आपल्या रोजच्या आहारात आवर्जून असावा.

अ‍ॅनिमियापासून बचाव करण्यासाठी लोह, फोलिक अ‍ॅसिड आवश्यक असते कढीपत्त्यामध्ये हे घटक भरपूर प्रमाणात असतात. रोज सकाळी अनशापोटी दोन-तीन कढीपत्त्यांची पाने खजुरासमवेत खाल्ली पाहिजे. शरीरात लोहाची पातळी वाढते आणि अ‍ॅनिमियाची शक्यता कमी होते. तसेच शरीरात लोहाची पातळी योग्य राहण्यास मदत होते आणि अ‍ॅनिमियाची शक्यता कमी होते.

यकृत चांगले राखण्यासाठीही कढीपत्ता उपयुक्‍त असतो. आहाराच्या चुकीच्या सवयी आणि अतिमद्य सेवनामुळे अशक्‍त झालेल्या यकृताचे आरोग्य चांगले राखते. कढीपत्त्यामध्ये अ आणि क जीवनसत्त्व असते. त्यामुळे यकृताचे कार्य योग्य पद्धतीने होण्यासाठी औषध म्हणून काम करते. पचन प्रक्रिया चांगली राखण्यासही कढीपत्ता उपयोगी ठरतो.

जीवाणूप्रतिबंधक आणि सूजप्रतिबंधक गुणांनी युक्‍त कढीपत्ता पोटाच्या समस्या दूर करतो. त्यातील कार्मिनिटीव्ह घटकामुळे बद्धकोष्ठता दूर होते तर कार्बोजोल जुलाब किंवा डायरियामध्ये आराम मिळवून देते. यासाठी आठ-दहा कढीपत्ते वाटून त्यांचा रस काढावा. त्यात ताक मिसळून दिवसातून दोन-तीन वेळा प्यावे.

अपचनात आराम हवा असेल तरीही कढीपत्ता वापरू शकतो. त्यासाठी तूप गरम करून त्यात आठ-दहा कढीपत्त्याची पाने, थोडे जिरे, दीड चमचा सुंठ, मध आणि पाणी मिसळून उकळावे. थंड करून ते प्यावे.

केसांच्या समस्या

केसाच्या समस्या दूर करण्यासाठी कढीपत्त्यातील प्रथिने, खनिजे, बीटा कॅरोटीन, अँटिऑक्सिडंट आणि जीवाणूप्रतिरोधक गुण यांचा उपयोग आहे. कढीपत्त्याचा लेप केसाला लावल्याने केस गळणे, केस अवेळी पांढरे होणे थांबते. केस रूक्ष, कोरडे होणे आणि कोंडा होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. त्यासाठी कढीपत्त्याच्या वापर विविध प्रकारे वापरू शकतो. कढीपत्ता सेवनही करू शकतो.

उन्हात कढीपत्त्याची पाने सुकवून ती वाटून दही मिसळून तयार झालेला मास्क स्काल्पवर लावू शकतो. कढीपत्ता तेलात गरम करून केसाला लावू शकतो. कढीपत्ता पाण्यात उकळून केलेला काढा थंड झाल्यावर केसाला लावावा. कढीपत्त्याचा लेप तयार करण्यासाठी 10-12 बदाम भिजवून ठेवावे. सकाळी त्याची साले काढून 10-15 कढी पत्त्याची पाने आणि थोडेसे पाणी मिसळून त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट डोक्याच्या त्वचेला लावून मसाज करावा. काही वेळाने शॅम्पूने केस धुवून टाकावे.

कढीपत्त्याचा चहा देखील फायदेशीर असतो. कढीपत्ता पाण्यात उकळावा त्यात लिंबू आणि मध मिसळून रोज कमीत कमी एकदा सेवन करावा.

कढीपत्त्यातील अँटिऑक्सिडंट, जीवाणूविरोधी आणि बुरशीविरोधी गुण त्वचेला झालेला संसर्ग दूर करण्यासाठी मदत करतात.

कढीपत्त्याचा फेस पॅक लावल्याने मुरूम, कोरडेपणा, डाग, वाढत्या वयाच्या खुणा असणार्‍या सुरकुत्या दूर करण्यास मदत होते. फेस पॅक तयार करण्यासाठी कढीपत्ता उन्हात सुकवून त्याची पूड करावी. या पुडीमध्ये गुलाबजल, मुलतानी माती, थोडी चंदन पावडर आणि नारळ तेल मिसळून घट्ट पेस्ट करून घ्या. हा फेस पॅक हलक्या हातांनी चेहर्‍यावर लावावा. 15-20 मिनिटांनी हा फेस पॅक सुकल्यावर थंड पाण्याने धुवून घ्या.

बद्धकोष्ठतेपासून सुटका करण्यासाठी कढीपत्ता उपयोगी ठरतो. बद्धकोष्ठतेमुळे मळमळ, घाबरल्यासारखे होणे, उलटी येणे, अशा स्थितीत कढीपत्त्याचा रस पाव कप, अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चिमूट साखर मिसळून प्यायल्यास फायदा होतो.

मूळव्याधीतही फायदा होतो कारण कढीपत्ता थंड प्रकृतीचा असतो. पाव कप पाण्याबरोबर आठ-दहा कढीपत्ते वाटून घ्यावे. ते पाणी गाळून प्यावे त्याचा फायदा होतो. कढीपत्त्यात असलेले तंतुमय पदार्थ शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. त्यामुळे वजनही कमी होते. त्यासाठी आठ-दहा कढीपत्ते चावून खावेत. कढीपत्त्यातील तंतुमय पदार्थ शरीरातील इन्सुलिन कमी करून रक्‍तशर्करेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मधुमेह दूर करण्यासाठी रोज सकाळी अनशापोटी आठ दहा कढीपत्ते चावून खावेत..

हे ही वाचलं का ?

SCROLL FOR NEXT