नाक सतत वाहतंय, पथ्य काय पाळावे? | पुढारी

नाक सतत वाहतंय, पथ्य काय पाळावे?

कपाळात, डोक्यात सर्दी साठून डोकेदुखी, दमा सुरू होतो. या अवस्थेत रजन्यादि वटी तीन गोळ्या चार वेळा चघळून खाव्या. सोबत लक्ष्मीनाराण, ज्चरांकुश, दमा गोळी, लवंगादि गुग्गुळ प्रत्येकी तीन गोळ्या, दोन वेळा चावून खाव्यात. एवढ्याने कमी झाल्यास रजन्यादि वटी सहा गोळ्या चार वेळा चावून खाव्यात. नाकातील पाणी वाढण्यास नक्कीच उतार पडतो. नाकाला आतमध्ये चांगले तूप लावावे. सकाळी उठल्याबरोबर महानारायण तेलाचे थेंब नाकात टाकावे.

रोज रात्री त्रिफळा चूर्ण किंवा गंधर्वहरीतकी चूर्ण घेऊन, संडासला साफ होऊन, नाकातून पाणी वाहण्यास उतार पडतो का ते पहावे. लघवीची तक्रार असल्यास गोक्षुरादिगुग्गुळ सहा गोळ्या दोन वेळा घेऊन पहाव्या. एवढ्याने न भागल्यास एकदा सर्वांगाला घाम येईल असा वाफारा किंवा पेटिका स्वेद घ्यावा.

ऋतूमानाला धरून रात्री झोपताना आणि सकाळी अंघोळीचे अगोदर सर्वांगाला बलदायी महानारायण तेलाचे समाज करावे. कफ, खोकला असल्यास खोकला काढा, कुमारी आसव किंवा नागरादिकषाय जेवणानंतर घ्यावा. आवाज बसला असल्यास एलादि वटी चघळावी.

ग्रंंथोक्त उपचार : हरिद्राखंड, कुमारीआसव, एलादि वटी, सीतोपलादि चूर्ण, एक वेळ घाम भरपूर येईल असे गरम गरम पाणी प्यावे.

विशेष दक्षता आणि विहार : नाकात पाणी साठणार नाही यासाठी गार वारे, फ्रिजचे पदार्थ, दही, दिवसा खूप पाणी पिणे, वातानुकूलित खोलीत सतत राहणे, धूळ, उदबत्तीस टाळावे.

पथ्य काय? : ओली हळद, पुदिना, आले, लसूण आणि मिरपूड अशी चटणी; शेवगा, सुरण, तूर, मसूर, मेथी, बाजरी, तीळ, कारळे, बडीशेप, शेंगदाणे, खोबरे, बिब्ब्याची सुपारी, उडीद, अननस, पपई यांचे सेवन.

कुपथ्य : दही, लोणचे, पापड, इडली, डोसा, फरसाण, श्रीखंड, पाव, चिंच, कैरी , लिंबू संत्रे, मोसंबी, टमाटू, काकडी, फ्रिजमधील पदार्थ, कोल्ड्रिंक, केळे, शिकरण, ताक, भात, आंबवलेले पदार्थ.

रसायन चिकित्सा : ओली हळद वाटून त्याचा रस घेणे, रजन्यादि वटी, लवंगादि गुग्गुळ.

योग आणि व्यायाम : प्राणायाम, भरपूर व्यायाम करणे, फिरणेे, पळणे, दोरीच्या उड्या, सूर्यनमस्कार इत्यादी.

रुग्णालयीन उपचार : प्रवेशित होऊन सर्वांगाला पेटिकास्वेद घ्यावा. नाकावर लेप लावावा.
अन्य षष्ठी उपक्रम (पंचकर्मादि) : स्नेह, स्वेदपूर्व कर्म करून मग अणुतेलाचे नस्य करावे, वमन घेणे.

चिकित्साकाल : सामान्य सर्दी असल्यास आठ दिवस ते एक महिना.

निसर्गोपचार : नाकात कोणतेही तेल टाकणे, सुंठ, वेखंड यांचा गरम लेप लावणे, तुळशीची पाने खाणे.

अपुनर्भवचिकित्सा : नियमितपणे नाकात औषध टाकणे; तूप, अणुतेल, महानारायण तेल इत्यादी. नाकावर सुंठ आणि वेखंड लेप; धूप, उद, वेखंड, शोपा, ओवा यांचा धूर सोसवेल इतपत घ्यावा. रजन्यादि वटी.

संकीर्ण : नाकाचे वरचे भागात कशामुळे पाण्याचा साठा वाढतो याकडे लक्ष द्यावे. धुळीची, पुस्तकाची, टायर, उदबत्ती, घाण वास यांची अ‍ॅलर्जी; मलावरोध, लघवी कमी होणे, फाजील तहान याकडे बारकाईने लक्ष द्यावे.

वैद्य विनायक खडीवाले

Back to top button