Latest

Kedarnath temple : केदारनाथ मंदिर २५ एप्रिल पासून भाविकांसाठी खुले

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : केदारनाथ मंदिर २५ एप्रिलपासून सर्व भाविकांसाठी खूले होणार आहे. याबाबत संबधित अधिकाऱ्यांनी आज (दि.५) माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितले की, भाविक केदारनाथ धामला चालत आणि हेलिकॉप्टरने जाऊ शकतील. राज्याच्या पर्यटन विभागाच्या माहितीनुसार, इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ला हेलिकॉप्टरने केदारनाथ धामला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी ऑनलाइन बुकिंगसाठी अधिकृत करण्यात आले आहे. (Kedarnath temple)

६.३४ लाख भाविकांची नोंदणी

उत्तराखंड पर्यटन विकास परिषदेच्या माहितीनुसार, यंदा चारधाम यात्रेसाठी ६.३४ लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी केदारनाथ धामसाठी २.४१ लाख आणि बद्रीनाथ धामसाठी २.०१ लाख, यमनोत्री धामसाठी ९५,१०७ आणि गंगोत्री धामसाठी ९६,४४९ भाविकांची नोंदणी झाली आहे.

50 आरोग्य एटीएम तैनात

चारधाम यात्रेदरम्यान 50 आरोग्य एटीएम तैनात करण्यासाठी सामंजस्य करार केला. ज्याद्वारे भाविकांना गढवाल विभागातील ओळखल्या गेलेल्या वैद्यकीय युनिटमध्ये वैद्यकीय सेवा मिळणार आहे. मुख्यमंत्री धामी म्‍हणाले होते की, "चारधाम यात्रेदरम्यान आरोग्य तपासणीसाठी हेल्थ एटीएम उभारण्यात येणार आहे. या सुविधेमुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात सुविधा मिळणार आहेत. हेल्थ एटीएम रुग्णाचे वजन, उंची, रक्तदाब, रक्तातील साखर, शरीराचे तापमान आणि ऑक्सिजन संपृक्तता तपासू शकतात. चारधाम यात्रेदरम्यान यात्रेकरूंना आरोग्यासंबंधी कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी आरोग्य सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करण्यात येत आहेत."

Kedarnath temple : चारधाम यात्रा

उत्तराखंडमधील चारधाम यात्रा ही भारतातील सर्वात लोकप्रिय हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे तीर्थक्षेत्र हिमालयात उंचावर वसलेल्या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चार पवित्र स्थळांची यात्रा आहे. उंचावरील ही मंदिरे दरवर्षी सुमारे सहा महिने बंद राहतात. उन्हाळ्यात (एप्रिल किंवा मे) उघडतात आणि हिवाळा सुरू झाल्यावर (ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर) बंद होतात. एएनआय या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, २२ एप्रिलला यमुनोत्री आणि गंगोत्री मंदिरे उघडून चारधाम यात्रा सुरू होईल. केदारनाथ २५ एप्रिल आणि बद्रीनाथ २७ एप्रिलला उघडेल.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT