Latest

‘झॉलीवूड’मध्ये झळकणार झाडीपट्टीचे १३० कलाकार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

बऱ्याच राष्ट्रीय-आंतररष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला, पुरस्कार प्राप्त 'झॉलीवूड' हा चित्रपट ३ जून रोजी प्रदर्शित होत आहे. झाडीपट्टी रंगभूमीवर आधारित या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे झाडीपट्टीवरचे खरेखुरे कलाकार आणि यापूर्वी कधीच अभिनय न केलेले सर्वसामान्य लोक चित्रपटांतील भूमिकांमध्ये दिसतील.

विशबेरी फिल्म्सच्या प्रियंका अगरवाल, अंशुलिका दुबे, शाश्वत सिंग यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून अमित मसूरकर आणि डयुक्स फार्मिंग फिल्म्स चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. न्यूटन, शेरनी, सुलेमानी किडा असे दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित केलेले अमित मसूरकर या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आणि प्रस्तुतकर्ते आहेत. हा चित्रपट नव्या दमाचा दिग्दर्शक तृषांत इंगळेने दिग्दर्शित केला आहे.

विदर्भात लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी नाटकांविषयी उर्वरित महाराष्ट्रात विशेष माहिती नाही. मात्र, झाडीपट्टी रंगभूमी हा अतिशय खास कलाप्रकार तर आहेच. पण झाडीपट्टी ही जणू एक इंडस्ट्रीच आहे. त्यामुळे 'झॉलीवूड'मधून पहिल्यांदाच झाडीपट्टी चित्रपटाच्या रुपात जगभरात पोहोचणार आहे. हा चित्रपट बऱ्याच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये दाखवला गेला आहे. राज्य पुरस्कारांमध्येही या चित्रपटानं नामांकनं मिळवली आहेत.

कलाकार निवडीविषयी तृषांत सांगतो, चित्रपटातील भूमिकांसाठी अस्सल दिसणारे, तिथली भाषा बोलणारे कलाकार हवे होते. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील होतो. व्यावसायिक कलाकार निवडल्यास त्यांचं दिसणं, त्यांची भाषा, त्यांचा लहेजा अशा गोष्टी खऱ्याखुऱ्या वाटण्यासाठी त्यांच्यावर खूप काम करावं लागतं. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. पण, नॉन अॅक्टर्स घेतल्यास किंवा झाडीपट्टीवरचेच कलाकार घेतल्यास त्यांचं निरागस असणं, अस्सल दिसणं, बोलणं चित्रपटाला अधिक उपयुक्त ठरेल हा विचार होता. त्यामुळे राहुल गावंडे आणि सौरभ हिरकणे या आमच्या कास्टिंग दिग्दर्शकांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ऑडिशन्स घेतल्या. त्यातून पाच-साडेपाचशे लोकांची निवड केली. त्यातील काही झाडीपट्टीवरचेही कलाकार होते. त्यातून आणखी उत्तम कलाकारांची अंतिम निवड केलीय.

ज्या गावात चित्रीकरण करायचं होतं, त्या गावातलेही कलाकार निवडले. चित्रीकरणावेळी सुरुवातीला कॅमेऱ्यासमोर सर्वजण लाजत होते, बावरत होते. पण या सर्वांनीच अप्रतिम अभिनय केला आहे. त्यांचा अभिनय हा अगदी नैसर्गिक आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट अस्सल झाडीपट्टीचा अनुभव देईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT