सातारा : गृहमंत्र्यांकडून भोंगे, अत्याचार, सावकारीचा आढावा | पुढारी

सातारा : गृहमंत्र्यांकडून भोंगे, अत्याचार, सावकारीचा आढावा

सातारा : पुढारी वृत्तसेवा कळीचा मुद्दा बनलेला भोंगा, महिला अत्याचाराचे वाढते गुन्हे, सावकारीसह विविध गुन्ह्यांची माहिती गृहमंत्री ना. दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडून घेतली. पोलिस मुख्यालयाला भेट दिल्यानंतर घेतलेल्या आढावा बैठकीत पोलिसांनी राबवलेल्या विविध उपक्रमांचे कौतुकही त्यांनी केले. दरम्यान, डायल 112, पोलिस कॅन्टीन अ‍ॅपचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

गृहमंत्री ना. दिलीप वळसे-पाटील रविवारी सातारा जिल्हा दौर्‍यावर होते. रविवारी रात्री उशीरा त्यांनी सातारा पोलिस मुख्यालयात भेट दिली. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्‍हाडे, सहा. पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

रविवारी रात्री 8.30 वाजता गृहमंत्र्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली. पोलिस दलाचे संख्याबळ, गुन्हे प्रतिबंधक कारवाई, गुन्हे दोषसिध्दी, कोरोना कालावधीत केलेली कारवाई, जिल्ह्याचे कायदा व सुव्यवस्थेचे मुद्दे, महिला सुरक्षा पथदर्शी, प्रकल्प, निर्भया पथक तसेच सध्या हॉट बनलेल्या मंदीर मशिदीवरील भोंग्याबाबतची गृहमंत्र्यांनी माहिती घेतली. आढावा बैठकीनंतर नव्याने सुरु केेलेल्या विविध उपक्रमांना भेटी दिल्या.

सातारा पोलिस दलाची वेबसाईट नव्याने करण्यात आली असून त्याचे उद्घाटन करण्यात आले. सर्वसामान्यांना हे संकेतस्थळ सहज हाताळता येण्यासारखे आहे. लोकाभिमुख केलेली ही साईट मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये अपडेट करण्यात आली आहे. तसेच ई-चलन, ऑनलाईन तक्रार, पोलिस भरती याचीही माहिती कायमस्वरुपी दिली जाणार आहे. दरम्यान, तात्काळ मदतीची सेवा पुरवणार्‍या ‘डायल 112’ व पोलिस अधिकारी कर्मचार्‍यांसाठी असलेल्या सागरिका या कॅन्टीनचे बनवलेले नवीन अ‍ॅपचे उद्घाटन करण्यात आले.
लॉ अ‍ॅन्ड ऑर्डर, विविध बंदोबस्त, गुन्हेगारीला आळा घालणे यासाठी नव्याने डीपीडीसीमधून खरेदी केलेल्या 20 दुचाकींचे हस्तातंरण गृहमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. या वाहनांचा वापर डायल 112 व महिला पथदर्शी उपक्रमासाठी केला जाणार आहे. सुमारे दोन तास गृहमंत्र्यांनी पोलिस दलाचा आढावा घेतले. सातारा पोलिस राबवत असलेले उपक्रम कौतुकास्पद असून विविध सूचना करत पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या टीमला त्यांनी शुभेच्छा दिल्या.

खा. उदयनराजे ना. वळसे-पाटलांना भेटले… 

सातारच्या शासकीय विश्रामगृहावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेऊन चर्चा केली. दुपारी पावणे दोनच्या सुमारास उदयनराजे आले होते. जवळपास 15 ते 20 मिनीटे चर्चा करुन ते विश्रामगृहाबाहेर पडले. या भेटीचा अधिक तपशील सांगण्यात आला नाही. यावेळी खा. उदयनराजे यांनी ना. वळसे-पाटील यांच्याबरोबर बराचवेळ चर्चा केली. 15 मिनीटानंतर उदयनराजे विश्रामगृहातून बाहेर पडले. दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तूळात चर्चा सुरु झाली आहे.

Back to top button