

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेत गाजलेल्या घरफाळा घोटाळ्यात संजय भोसले यांनी 27 कोटींचा घोटाळा केल्याचे सिद्ध झाले आहे. लवकरच त्यांचे निलंबन होऊन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठीच भोसले यांनी कर्मचारी युनियनच्या माध्यमातून दबाव टाकून संपाचा इशारा दिला आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी भोसले यांचा हा प्रयत्न हाणून पाडून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी केली आहे. शिष्टमंडळाने प्रशासक डॉ. बलकवडे यांना मागणीचे निवेदनही दिले.
प्रभारी करनिर्धारक व संग्राहक असताना भोसले यांना आर्थिक भ—ष्टाचाराबाबत 9 कारणे दाखवा नोटिसा दिल्या आहेत. कारवाई होणार असल्याने भोसले यांनी प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी 12 मे पासून सर्व कर्मचारी संपावर जातील, अशी नोटीस दिली आहे. महापालिकेतील सर्व स्वाभिमानी कर्मचारी, युनियनचे इतर पदाधिकार्यांनी भोसले यांनी केलेल्या घरफाळा घोटाळ्याची माहिती प्रशासनाकडून कागदपत्रासह घ्यावी. तसेच भोसले यांच्या पाठीशी राहू नये, असे आवाहनही निवेदनात केले आहे. यापूर्वीही भोसले यांनी युनियनच्या माध्यमातून तत्कालीन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. दबावाकडे दुर्लक्ष करून डॉ. कलशेट्टी यांनी भोसले गेली आठ वर्षे बेकायदेशीर वापरत असलेले महापालिकेचे वाहन काढून घेतले.
तसेच 50 लाखांचे आर्थिक नुकसान केल्याबद्दल कारवाई केली होती. शिष्टमंडळात सुभाषनगर मंडळाचे मोहन पोवार, रवी सातपुते, रवी धामणीकर, पंडित बामणे, रवी पोवार आदींसह इतरांचा समावेश होता.