पुढारी ऑनलाईन डेस्क
दिल्लीतील तिहार तुरूंगातून २०० कोटी रूपयांच्या वसुलीप्रकरणी रोज नवनवीन गोष्टी बाहेर येत आहेत. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केले आहे.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाखल केलेल्या आरोपपत्रात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline) आणि नोरा फतेही यांच्या नावाचा उल्लेख असून त्यांच्या महत्त्वाच्या विधानांचा समावेश करण्यात आला आहे. सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन फर्नांडिस यांनी जानेवारी 2021 पासून एकमेकांशी बोलणे सुरू केल्याचे ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार सुकेश याने जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline) १० कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. यामध्ये विविध प्रकारची आभुषणे, हिरेजडीत दागिने, क्रॉकरी, चार फ्रेंच जातीची मांजरे (एका मांजराची किंमत अंदाजे एक लाख रूपये) आणि ५२ लाख रूपये किंमतीचा एक घोडा पण आहे. त्याचबरोबर सुकेशने जॅकलीनचा भाऊ आणि बहिणीलाही मोठी रक्कम पाठवली होती. त्यानंतर ईडीने जॅकलिनच्या जवळचे सहकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली होती.
त्याचबरोबर सुकेशने नोरा फतेहीलाही बीएमडब्ल्यू कार आणि आयफोन भेट दिला होता. त्याची एकूण किंमत एक कोटींहून अधिक होती. तिहार तुरुंगातून 200 कोटी वसूल केल्याप्रकरणी मनी लाँड्रिंग अंतर्गत दाखल केलेल्या ईडीच्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे.
या आरोपपत्रात असेही म्हंटले आहे की, सुकेश चंद्रशेखर हा तुरुंगात असताना, अधून मधून जॅकलिनशी मोबाईलच्या माध्यमातून बोलत होता. तो जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने चेन्नईला जाण्यासाठी चार्टर्ड फ्लाइटही बुक केली होती. तसेच जॅकलीन फर्नांडिससाठी मुंबई ते दिल्लीचे चार्टर्ड फ्लाइटही बुक केले होते.
हेही वाचा