एक असे मुख्यमंत्री ज्यांचा पत्ता शोधण्यासाठी पोलिसांना लागले होते 2 तास | पुढारी

एक असे मुख्यमंत्री ज्यांचा पत्ता शोधण्यासाठी पोलिसांना लागले होते 2 तास

पुढारी ऑनलाईन: ही आहेगोष्ट १९९९ सालची. कल्याण सिंह हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते पण पक्ष नेतृत्वाशी, विशेषत: तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी त्यांचे मतभेद झाले होते. आरएसएस आणि जनसंघाच्या काळापासून या दोन्ही नेत्यांनी एकत्र राजकारण केले आणि दोघेही भाजपचे मोठे चेहरे बनले होते. अटलबिहारी वाजपेयी हे भाजपमध्ये ब्राह्मण चेहरा होते, तर कल्याण सिंह हे मागासवर्गीय.

दोघांची मैत्री आणि जुगलबंदी पक्षात लोकप्रिय होती. कल्याण सिंह हे यूपीचे मोठे नेते होते, तेव्हा अटल हे राष्ट्रीय पातळीवर भाजपचे मोठे नेते आणि चेहरा होते. पण जेव्हा दोघांमध्ये भांडणे सुरू झाली तेव्हा कल्याण सिंह यांनी 1999 च्या लोकसभा निवडणुकीतच यूपी जिंकण्याचे आव्हान भाजप नेतृत्वाला दिले. पक्ष नेतृत्वाला आव्हान दिल्यामुळे दोन्ही नेत्यांमधील अहंकाराची लढाई आणखी वाढली. त्यावेळी कल्याण सिंह यांना हिंदूहृदयसम्राट म्हणत.

या भांडणाचा परिणाम असा झाला की, राज्यात भाजप दोन गटात विभागला गेला. 13 महिन्यांपूर्वी ज्या जागेवरून (लखनऊ लोकसभा) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1998 मध्ये 4 लाख 31 हजार मतांनी विजय मिळवला होता, ती जागा त्यांना आता 70 हजार एवढ्या कमी मतांनी जिंकावी लागली. इतकेच नाही तर 1998 मध्ये भाजपने यूपीमध्ये 58 जागा जिंकल्या होत्या, मात्र 1999 मध्ये त्या निम्म्या म्हणजे 29 वर आल्या. अटलबिहारी वाजपेयी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत, यासाठी कल्याण सिंह यांनी राज्यात मतदानाच्या दिवशी कडक प्रशासनाचे आदेश दिल्याचे सांगण्यात येते.

इकडे कल्याण सिंह सरकारचे दोन मोठे मंत्री कलराज मिश्रा आणि लालजी टंडन त्यांच्या विरोधात झेंडा रोवत होते. दोन्ही नेत्यांनी उघडपणे कल्याण सिंह यांच्या विरोधात सुमारे सहा महिने संघर्ष केला. अटलबिहारी वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर भाजपने लगेचच कल्याणसिंग यांना हटवण्याचा निर्णय घेतला.

10 ऑक्टोबर 1999 रोजी अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि एका महिन्यातच कल्याण सिंह यांना डच्चू देण्यात आला. जेव्हा कल्याण सिंह यांनी पंतप्रधान वाजपेयींचा फोन घेतला नाही, तेव्हा 10 नोव्हेंबरच्या रात्री उशिरा पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत कल्याण सिंह यांचा उत्तराधिकारी कोण याबद्दल चर्चा सुरू झाली. कल्याण सिंह यांच्या विरोधात झेंडा रोवणारे लालजी टंडन आणि कलराज मिश्र हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार होते. वाजपेयी यांना भाजपचे तत्कालीन उत्तर प्रदेशचे अध्यक्ष राजनाथ सिंह, तर मुरली मनोहर जोशी यांना ब्राह्मण चेहरा मुख्यमंत्री पदी हवा होता. पण कल्याण सिंग यांनी खेळलेल्या मागासवर्गीय कार्डमुळे हे तीनही नेते त्यावेळी मुख्यमंत्री बनू शकले नाहीत.

पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला पंतप्रधान वाजपेयींव्यतिरिक्त भाजपचे तत्कालीन अध्यक्ष कुशाभाऊ ठाकरे, केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री मुरली मनोहर जोशी उपस्थित होते. मग या बैठकीत अशा नावावर चर्चा झाली, ते नाव जवळपास राजकारणातून दूर झाले होते. त्यानंतर पक्षाने निर्णय घेतला की, 76 वर्षीय राम प्रकाश गुप्ता हे कल्याण सिंह यांचे उत्तराधिकारी म्हणून जागा घेतील.

जेव्हा पक्षाने त्यांचे नाव निश्चित केले तेव्हा त्यांना दिल्लीला बोलावण्यात आले. परंतु गुप्ता लखनऊमध्ये कोठे राहतात हे कोणालाही माहिती नव्हते. त्यानंतर लखनऊ पोलिसांना रामप्रकाश गुप्ता यांचे दोन खोल्यांचे घर शोधण्यासाठी दोन तासांहून अधिक वेळ लागला होता. दुसऱ्या दिवशी गुप्ता दिल्लीला पोहोचले आणि पीएम हाऊसमध्ये गेले. कोवळ्या उन्हात हिरवळीवर उभे असेलल्या गुप्तांना एकाही पत्रकाराने ओळखले नाही. नंतर भाजप अध्यक्ष कुशाभाऊ ठाकरे यांनी जाहीर केले की, ते रामप्रकाश गुप्ता आहेत आणि कल्याण सिंह यांची जागा घेणार आहेत.

एका दिवसानंतर म्हणजे 12 नोव्हेंबर 1999 रोजी गुप्ता यांनी राज्याचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते जवळपास एक वर्ष म्हणजे 28 ऑक्टोबर 2000 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. राज्यसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव आणि विधान परिषद निवडणुकीत माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे पुत्र सुनील शास्त्री यांचा पराभव झाल्यानंतर पक्षनेतृत्वाने त्यांना दिल्लीत बोलावले. दिल्लीत त्यांचा राजीनामा घेऊन तत्कालीन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री राजनाथ सिंह यांना मुख्यमंत्री करण्यात आले.

Back to top button