Latest

J&K News : कुलगाममध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत ३ जवान शहीद; श्रीनगरमध्ये TRF च्या ३ दहशतवाद्यांना अटक

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : J&K News : दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशवाद्यांसोबतच्या चकमकीत भारतीय सेनेचे तीन जवान शहीद झाले. ही चकमक अजूनही सुरू आहे. संपूर्ण भागात शोधमोहीम सुरू आहे. या भागात तीन आतंकवादी लपल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दलांना पाठवण्यात आले. तर दुसरीकडे श्रीनगरमध्ये लष्करे तोयबाची सहकारी संघटना टीआरएफ (द रजिस्टेंस फ्रंट)च्या ३ दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळत अटक करण्यात आली आहे.

भारतीय सेनेने याविषयी ट्विट करून माहिती दिली आहे. यात म्हटले आहे की श्रीनगर येथील चिनार कोरने सांगितले की शुक्रवारी कुलगामच्या हालन वन क्षेत्रात उंच ठिकाणी दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर फायरिंग सुरू केली. J&K News

त्याच्या प्रत्युत्तरात सैन्याने देखील गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांसोबतच्या या चकमकीत ३ जवान गंभीर जखमी झाले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हेड कॉन्स्टेबल बाबूलाल, कॉन्स्टेबल वसीम अहमद आणि सचिन अशी शहीद जवानांची नावे असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, सैन्याकडून जवानांची नावे जाहीर केलेली नाहीत.

दरम्यान चकमक अद्यापही सुरू आहे. दहशतवाद्यांनी पळून जाऊ नये म्हणून सुरक्षा दलाने संपूर्ण भागाला घेरले आहे आणि दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. सुरक्षा दलाने कडक पहारा सुरू केला आहे.

J&K News : श्रीनगरमधून लष्करची सहयोगी संघटना TRF च्या दहशतवाद्यांना अटक

श्रीनगरमध्ये घातपाती कारवाईच्या उद्देशाने फिरत असलेल्या लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेची सहयोगी संघटना TRF (द रेझिस्टन्स फ्रंट) च्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून तीन हातबॉम्ब, 10 पिस्तुल काडतुसे, 25 एके-47 काडतुसे आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हर्नबल नातीपोरा येथे टीआरएफशी संबंधित तीन दहशतवाद्यांना अटक केली.

इम्रान अहमद नजर रा. बमुला, वसीम अहमद मट्टा रा. श्रीनगर आणि वकील अहमद भट रा. बिजबिहाडा अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. हा वकील सक्रिय दहशतवादी होता आणि नुकताच तो जामिनावर बाहेर आला होता.

SCROLL FOR NEXT