दोन संशयित दहशतवाद्यांच्या अटकेनंतर ‘एनआयए’चे महासंचालक पुण्यात | पुढारी

दोन संशयित दहशतवाद्यांच्या अटकेनंतर 'एनआयए'चे महासंचालक पुण्यात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : इसिसच्या महाराष्ट्र मॉड्युलचा पर्दाफाश करत दोन संशयित दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत राष्ट्रीय तपास यंत्रणेचे ( एनआयए) महासंचालक दिनकर गुप्ता यांनी पोलिस आयुक्त रितेशकुमार यांची भेट घेतली. त्यांनी पुणे पोलिसांकडून या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली आणि पुणे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. या वेळी त्यांच्यासोबत राज्यातील एनआयएचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांचा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला होता. मात्र, महंमद खान, महंमद साकी हे दोन दहशतवादी हाती लागल्यानंतर पोलिसांचा तपास जसजसा पुढे गेला, तसतशी धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. त्यानंतर त्यांना राहण्यासाठी घर देणार्‍या अब्दुल दस्तगीर कादीर पठाण व त्यानंतर त्या दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविणार्‍या समिब काझी याला अटक करण्यात आली. या चौघांकडील तपासात त्याचा संबंध एनआयएने यापूर्वी अटक केलेल्या झुल्फिकार बडोदावाला याच्याशी असल्याचे निष्पन्न झाले.

त्याने बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिल्याने व ‘आपले किट आपणच बनवा’ अशी शिकवण दिल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एनआयएने त्याला अटक केली होती. त्यामुळे महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) त्याला ऑर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेत अटक केली. मोहंमद खान, मोहंमद साकी यांना बॉम्ब बनिवण्याचे प्रशिक्षण दिल्याच्या संशयावरून व त्याचा या प्रकरणाशी संबंध आल्याने त्याला अटक केल्याचे तपासात आजवर निष्पन्न झाले आहे. शनिवारी चौघांची पोलिस कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्या वेळी आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

या तपासातील छोटीशी गोष्टही या तपासाला वेगळी दिशा देऊ शकते, या अनुषंगाने गुप्ता व महाराष्ट्रातील एनआयएच्या पथकाचे वरिष्ठ अधिकारी यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. दरम्यान, पुण्यातील मोठा कट उघड करण्यास तपास यंत्रणांना दिशा मिळाल्याने देशात अशा पद्धतीने कोठे घातपात घडवायचा होता का ? त्या दृष्टीनेदेखील देशातील सर्व तपास यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. त्यातच एनआयएदेखील एटीएसच्या तपासावर पूर्ण लक्ष ठेऊन आहे.

तपास प्रगतिपथावर

पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी घातपाताचा शिजणारा कट पुणे पोलिसांनी उधळून लावला. पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच अंबोली येथील जंगलात बॉम्ब बनविण्याबरोबरच जंगलात चाचण्या झाल्या. हे दहशतवादाचे प्रकरण पुणे पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे उघड झाले. त्यामुळे मोठा घातपाताचा कट उधळून लावल्याबद्दल पुणे पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आता हे प्रकरण एटीएसकडे सोपविण्यात आले असून, तपास प्रगतिपथावर आहे.

हेही वाचा

लवंगी मिरची : फाटाफूट..!

पुणे विमानतळावरील जुन्या कार्गो टर्मिनलचे स्थलांतर

जागतिक तिरंदाजीत भारताला ९२ वर्षांत पहिले सुवर्णपदक

Back to top button