पुढारी ऑनलाईन डेस्क: पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येला जवळपास एक वर्ष पूर्ण होत आले असले तरी अजूनही मुख्य आरोपी फरारी आहेत. पोलीस अद्याप मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याचा हात असून तोच मुख्य सुत्रधार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, हत्येनंतर अनमोल गायब झाला असून पोलिस त्याच्या शोधात आहेत. दरम्यान अनमोल बिश्नोई याचा अमेरिकेतील एका पार्टीतील व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे सिद्धू मूसेवालाच्या ( Sidhu MooseWala ) हत्येचा सूत्रधार अमेरिकेत लपून बसल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे पार्टीतील शैरी मान आणि करण औजला यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आम्हाला याबद्दल काहीही माहिती नसल्याचे सांगितले आहे.
अमेरिकेतील पार्टीत शैरी मान आणि पंजाबी गायक करण औजला यांच्या सोबत अनमोल बिश्नोई स्पॉट झाला. व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून खळबळ उडाली आहे. काही काळापूर्वी अनमोलला केनियात ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली होती. मात्र, या व्हिडिओने सर्व गुपिते उघड केली असून अनमोल अमेरिकेत लपून बसल्याची माहिती समोर आली आहे. मूसेवाला हत्येत गायक करण औजलादेखील सहभागी असल्याची माहिती होती. मात्र, त्याच्याविरुद्ध कोणताही पुरावा पोलिसांना सापडला नाही. त्यामुळे त्याच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
व्हायरल व्हिडिओ झाल्यानंतर करण औजला आणि शैरी मान यांनी स्पष्टीकरण देत इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे की, 'आम्हाला फक्त लग्नाच्या रिसेप्शनमध्ये परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. एक कलाकार म्हणून कोण-कोण कार्यक्रमात सहभागी होते यांची आम्हला माहिती नसते. मला सांगण्यात आले आहे की, आमच्या शोमध्ये एक संशयित व्यक्ती दिसली होती. मी हा व्हायरल व्हिडिओ पाहण्या आधी हा संशयित व्यक्ती कोण होता हे मला माहीत नव्हते. मी एक कलाकार असून मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करतो. मी काम करून तिथून निघतो आणि कोण आले आणि कोण नाही ते पाहत नाही.' या स्पष्टीकरणावरून करण आणि शैरीला याबाबतची काहीच माहिती नसल्याचे सांगितले आहे.
सिद्धू मूसेवाला ( Sidhu MooseWala ) यांचा २९ मे २०२२ रोजी हत्या केल्यानंतर अनमोलने बनावट पासपोर्ट बनवला आणि तो परदेशात फरार झाला. तेव्हापासून पोलिस अनमोल बिष्णोईसह हत्येतील अन्य आरोपींच्या शोधात आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे. सिद्धु मूसेवालाचा मारेकरी केनियात नसून अमेरिकेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यावरून पुढील तपास पोलिस करत आहेत.
हेही वाचा :