सॅन फ्रान्सिस्को; वृत्तसंस्था : मेटाच्या मालकीचा फोटो-व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामने किशोरवयीन मुलांना नजरेसमोर ठेवत टेक अ ब्रेक हे नवीन फिचर मंगळवारी लाँच केले. तूर्तास अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, आयलँड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील यूजर्ससाठी हे फिचर उपलब्ध झाले आहे.
या फिचरच्या नावावरून त्याचा उपयोग स्पष्ट होतो. इन्स्टाग्रामवर अधिक वेळ व्यतीत करणार्यांना विशेषतः किशोरवयीन आणि तरुणांसाठी हे फिचर उपयुक्त ठरणारे आहे. जर तम्ही ठराविक कालावधीसाठी स्क्रोल करीत असाल, तर तसा रिमाइंडर या फिचरच्या माध्यमातून सेट करता येणार असून योग्य वेळ होताच तशी नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल. यामुळे या अॅपचा अतिरिक्त वापर संबंधिताला टाळता येईल. युझर्सना आगामी काळासाठी रिमाइंडर लावून ठेवण्याची सुविधा या फिचरअंतर्गत देण्यात आलेली आहे. शिवाय अतिरिक्त वापर टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या टीप्सही युझर्ससाठी उपलब्ध असतील.
इन्स्टाचा वापर करणार्या मुलांच्या पालकांसाठी आणखी एक फिचर आणण्याची कंपनीची योजना असून या फिचरद्वारे पालकांना आपल्या मुलांवर लक्ष ठेवता येईल. तसेच त्यांच्याकडून होणारा इन्स्टाचा वापरही मर्यादित करता येणार आहे. मार्च महिन्यापर्यंत हे फिचर सादर केले जाण्याची शक्यता आहे.