Latest

Indian Rupee | रुपयाच्या घसरणीला ब्रेक, डॉलरच्या तुलनेत सुधारणा, शेअर बाजारात चढ-उतार

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन; अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीच्या निकालापूर्वी अमेरिकी डॉलर इंडेक्स घसरला आहे. दरम्यान, बुधवारी भारतीय रुपयाने (Indian Rupee) अमेरिकी डॉलरच्या तुलनेत एका महिन्यातील उच्चांक गाठला. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य ८१.३९ एवढे आहे. रिपब्लिकन पक्षाने डेमोक्रॅटिक पक्षाकडून अमेरिकी काँग्रेसच्या एक किंवा दोन्ही सभागृहांवर सत्ता मिळविल्यास मध्यावधी निवडणुकांमुळे डॉलरला हानी पोहोचेल आणि इक्विटीला बळ मिळेल या शक्यतेने अमेरिकी डॉलर इंडेक्स ११० च्या खाली घसरला आहे. दरम्यान, जागतिक बाजारातील संमिश्र संकेत आणि भारतीय रुपया मजबूत झाल्याने बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात दोन्ही निर्देशांक वधारले.

शेअर बाजार खुला होताच ९.१६ वाजता बीएसई सेन्सेक्स २५१ अंकांनी वाढून ६१,४३६ वर गेला होता. तर निफ्टी ५६ अंकांनी वाढून १८,२५९ वर पोहोचला होता. त्यानंतर ही तेजी कमी होऊन दोन्ही निर्देशांक स्थिर पातळीवर आले होते. दरम्यान, आशियाई बाजारातील सुरुवातीच्या व्यवहारात जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ०.५२ टक्क्यांनी आणि चीनचा शांघाय कंपोझिट ०.३५ टक्क्यांनी घसरला तर दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.९२ टक्क्याने वाढला होता.

बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ५२ पैशांनी वधारून ८१.३९ वर होता. दरम्यान, सहा प्रमुख जागतिक चलनांच्या तुलनेत डॉलर निर्देशांक ००५ टक्क्यांनी कमी होऊन १०९.५८ पातळीवर आला. सप्टेंबर महिन्यात रुपयाने ८२ चा निच्चांक गाठला होता. तर गेल्या ऑक्टोबर महिन्यात डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी घसरून ८३.०१ वर पोहोचला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रुपयात चढ-उतार सुरु आहे.

रुपया घसरणीची ही आहेत कारण

रशिया-युक्रेन युद्ध, पुरवठा साखळीत अडथळा आणि अमरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून झालेली व्याजदरवाढ ही कारणे रुपयाच्या घसरणीला कारणीभूत ठरली होती. जेव्हा डॉलरची मागणी वाढते तेव्हा अन्य चलनांवर त्याचा दबाब येतो. पण आता रुपयात सुधारणा दिसून येत आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT