प्रॉव्हिडंड फंड खातेधारकांना आपल्या खात्यावर अनेक प्रकारचे लाभ मिळतात. यात मोठा फायदा म्हणजे पेन्शन. निवृत्तीनंतर ईपीएस-95 नुसार पेन्शनचा लाभ खातेधारकाला होतो. ईपीएफओचे अनेक नियम असतात आणि त्याची माहिती असतेच असे नाही. यापैकी एक नियम म्हणजे पालकांना मिळणारी पेन्शन.
वास्तविक, खातेधारकांना मिळणारी पेन्शन ही केवळ त्याचीच नसते, तर त्याच्यावर अवलंबून असणार्या लोकांची देखील असते. नोकरीच्या काळात नोकदारांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला विशेषत: आई-वडिलांना पेन्शन मिळते.
आपला नोकरदार मुलगा किंवा मुलगी यांचा अकाली मृत्यू झाल्यास, अशा वेळी कुटुंबासमवेत ईपीएफओ पाठीशी खंबीर उभे असते. नोकरदार पाल्याचा अकाली मृत्यू झाल्यास पालकांना किंवा कुटुंबाला आजन्म पेन्शन मिळते. अर्थात त्याच्यासाठी काही नियम आहेत.
पालकांना मिळणारी पेन्शन
ईपीएफओच्या पेन्शन स्किमची सुरुवात 1995 मध्ये झाली. त्यांच्या मते, नोकरी करताना एखाद्याचा मृत्यू झाल्यास आणि कुटुंब व पालक त्याच्यावर अवलंबून असतील अशा वेळी त्यांना ईपीएस-9 नुसार आजन्म पेन्शन मिळत राहील. यात अट म्हणजे, कर्मचार्याने किमान दहा वर्षं नोकरी पूर्ण केलेली असावी. कर्मचारी नोकरीच्या काळात आजारी पडल्यास आणि तो शारीरिकद़ृष्ट्या अपंग झाल्यास त्यालादेखील आजन्म पेन्शन मिळते. अशा स्थितीत दहा वर्षांच्या नोकरीची अट शिथिल ठेवण्यात आलेली आहे.
पेन्शनची आकडेमोड
* पेन्शन कॅलक्युलेटरची सुरुवातीची प्रोसेस ही 'ईडीएलआय कॅलक्युलेटर'प्रमाणेच आहे. पेन्शन कॅलक्युलेटर पेज उघडल्यानंतर पुढची प्रक्रिया सांगता येईल.
* आपल्याला जन्मतारीख नोंदवावी लागेल. त्याचबरोबर नोकरीत कधी रुजू झालात आणि कधी सोडली, यासारखे विवरण भरावे लागेल. त्यानंतर शो/अपडेट डिटेल्सला क्लिक करावे लागेल.
* यानंतर सिस्टीम आपल्याला 58 वर्षे पूर्ण होणारी तारीख, 'अर्ली पेन्शन'साठी 50 वर्षांचे वय आणि मंथली पेन्शनसाठी स्टार्टिंग डेट कॅलक्युलेट करेल.
* वयाची 50 वर्षे पूर्ण केल्यानंतर अर्ली पेन्शन घेऊ शकता. मात्र पेन्शनची रक्कम ही कमी राहील. त्याचवेळी 58 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पेन्शनचा संपूर्णपणे लाभ मिळेल.
* कॅलक्युलेटरमध्ये पेन्शन स्टार्टिंग डेट आणि सॅलरी नमूद करून शो/अपडेट डिटेल्सवर क्लिक करा. सिस्टीम आपल्याला मंथली पेन्शन अमाऊंट दाखवेल.
पीएफ किती जमा होतो?
कर्मचार्याच्या बेसिक सॅलरी आणि महागाई भत्ता यातून 12 टक्के वाटा हा पीएफमध्ये जमा करावा लागतो. तेवढाच वाटा कंपनीकडूनदेखील जमा केला जातो. निवृत्तीनंतर कर्मचार्याला संपूर्ण फंड व्याजासकट मिळते. कर्मचार्याचे बारा टक्के योगदान थेटपणे ईपीएफच्या खात्यावर जमा होते. त्याचवेळी कंपनीकडून 12 टक्क्यांपैकी 3.67 टक्के ईपीएफ आणि उर्वरित 8.33 टक्के वाटा पेन्शन स्कीमध्ये जमा होतो.