Latest

IND vs AUS : चौथ्या कसोटीत ईशान किशनला संधी मिळणार?

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना ९ मार्चपासून अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेत टीम इंडिया २-१ ने पुढे आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारतीय संघाला मालिकेतील शेवटचा सामना जिंकणे गरजेचे आहे. या सामन्यात भारताचा पराभव झाला तर, संघाला न्यूझीलंड-श्रीलंका मालिकेतील निकालावर अवलंबून राहावे लागेल. नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या चौथ्या कसोटीपूर्वी भारतीय संघ व्यवस्थापनासमोर सर्वात मोठा प्रश्न आहे की विकेटकीपर फलंदाज म्हणून केएस भरतला संधी द्यायची की ईशान किशनला…(IND vs AUS)

ऋषभ पंत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कार अपघातात जखमी झाला होता. तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्या जागी केएस भरत आणि ईशान किशन यांची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवड करण्यात आली होती. भरत याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान भारतीय संघात होता. त्याला एका सामन्यात काही काळ विकेटकीपिंगचीही संधी मिळाली होती; पण अधिकृतरित्या त्याला पदार्पण करता आले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याला पदार्पणाची संधी मिळाली. (IND vs AUS)

भरतने सूर्यकुमारसोबत कसोटी संघात केले पदार्पण

नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारतासोबतच सूर्यकुमार यादवलाही प्लेइंग-११ मध्ये संधी देण्यात आली होती. सूर्यकुमारने पहिल्या कसोटीत केवळ आठ धावा केल्या. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. त्‍याच्‍या जागी श्रेयस अय्यरला संघात स्थान देण्यात आले केएस भरतनेही सूर्यकुमारप्रमाणे धावा केल्या नाहीत, पण चांगल्या यष्टिरक्षणामुळे त्याला वारंवार संधी देण्यात आली असल्‍याचे मानले जात आहे.

तीन कसोटींमध्ये भरतची कामगिरी

भरतने नागपूर कसोटीत आठ धावा केल्या. त्यानंतर दिल्लीत नाबाद २३ धावांची तर   तिसऱ्या कसोटीत  तो नापास झाला. त्याने १७ आणि ३ धावा केल्या होत्या. भरतने तीन कसोटींच्या पाच डावांत ५७ धावा केल्या. त्याची सरासरी १४.२५ होती. त्याने सहा झेल घेतले आणि स्टंपिंगद्वारे एक विकेट घेतली आहे.

फलंदाजीत भरतची कामगिरी चांगली कामगिरी झाली नसली तरीही त्याने विकेटमागे चांगली कामगिरी केली आहे. विकेटमागे त्याने आतापर्यंत चूक केलेली नाही. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांसारख्या दिग्गज गोलंदाजांसमोर यष्टिरक्षण करणे सोपे नाही. भरतने फलंदाजीत अजून चांगली कामगिरी केली नसली तरी विकेटकीपिंगने त्याने सर्वांची मने जिंकली आहेत. याशिवाय डीआरएसमधील त्यांचा सल्ला प्रभावी ठरला आहे. रोहित शर्माला त्याच्या निर्णयावर विश्वास आहे.

ईशान किशनला मिळणार  संधी?

वन-डे आणि टी-२० क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या इशान किशनचा बॅकअप यष्टिरक्षक म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. भरतच्या खराब फॉर्ममुळे इशान किशनची  चर्चा सुरू झाली. किशनच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने ४८ सामन्यांत ३८.७६ च्या सरासरीने २९८५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ६ शतके आणि १६ अर्धशतके झळकली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या २७३ आहे. किशनची फर्स्ट क्लासमध्ये कामगिरी चांगली झाली असली तरी त्याला त्याच्या कसोटी पदार्पणासाठी वाट पहावी लागत आहे.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT