WPL 2023 : दिल्लीचा बंगळूरवर ६० धावांनी शानदार विजय | पुढारी

WPL 2023 : दिल्लीचा बंगळूरवर ६० धावांनी शानदार विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला प्रीमियर लीगचा दुसरा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आला. सामन्यात विजय मिळवून दिल्ली कॅपिटल्सने महिला प्रीमियर लीगमध्ये आपल्या मोहिमेची धमाकेदार सुरुवात केली. त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा 60 धावांनी पराभव केला.

आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सने हा निर्णय चुकीचा सिद्ध केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 2 बाद 223 धावा केल्या. प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ 20 षटकांत आठ गडी गमावून 163 धावापर्यंत मजल मारू शकला.

शेफाली वर्मा आणि मेग लॅनिंग यांनी दिल्लीसाठी शानदार कामगिरी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 91 चेंडूत 162 धावांची भागीदारी केली. शेफाली 45 चेंडूत 84 धावा करून बाद झाली. त्यांनी आपल्या खेळीत 10 चौकार आणि 4 षटकार मारले. कर्णधार मेग लॅनिंगने 43 चेंडूत 72 धावांची खेळी केली. यादरम्यान 14 चौकार मारले. मारिजन 17 चेंडूत 39 आणि जेमिमा रॉड्रिग्जने 15 चेंडूत 22 धावा केल्या. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 31 चेंडूत 60 धावांची नाबाद भागीदारी केली. आरसीबीकडून हेदर नाइटने दोन्ही विकेट घेतल्या.

स्मृतीने केल्या सर्वाधिक धावा

दिल्लीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना स्मृती मानधनाने संघासाठी सर्वाधिक 35 धावा केल्या. हीदर नाइटने 34, अॅलिस पॅरीने 31 आणि मेगन शुटने नाबाद 30 धावा केल्या. सोफी डिव्हाईनने 14 धावांचे योगदान दिले. दिशा कसाट 9, रिचा घोष आणि आशा शोभना प्रत्येकी दोन धावा करून बाद झाल्या. कनिका आहुजा खाते उघडू शकली नाही. प्रीती बोसने नाबाद दोन धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून अमेरिकेच्या तारा नॉरिसने सर्वाधिक ५ बळी घेतले. एलिस कॅप्सीने दोन गडी बाद केले. शिखा एक विकेट घेतली.

RCB संघ याच मैदानावर उद्या, सोमवारी (6 मार्च) त्यांच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. मुंबईने पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सचा 143 धावांनी पराभव केला. त्याच वेळी, दिल्ली संघ मंगळवारी (7 मार्च) डीवाय पाटील स्टेडियमवर यूपी वॉरियर्सशी भिडणार आहे.

हेही वाचा;

Back to top button