Latest

नाशिकमध्ये कांदा व्यापाऱ्यांचे पुन्हा बहिष्कारास्र ; लिलाव बंद

गणेश सोनवणे

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

नाफेड आणि राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघामार्फत (एनसीसीएफ) खरेदी केला जाणारा कांदा देशातील बाजारात पाठवला जात असल्याने व्यापाऱ्यांच्या मालाला परराज्यात उठावच नसल्याने जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी बुधवारपासून कांदा लिलावावर बहिष्कारास्र डागले. व्यापाऱ्यांच्या पवित्र्यामुळे ऐन गणेशोत्सवात पुन्हा कांदा कोंडी झाली आहे. जिल्ह्यातील १७ बाजार समित्यांमध्ये लिलाव थांबल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होऊन शेतकऱ्यांची स्थिती आणखी हलाखीची झाली आहे.

संबधित बातम्या :

कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू झाल्यानंतर ऑगस्टमध्ये व्यापाऱ्यांनी तीन दिवस जिल्ह्यातील लिलाव बंद पाडले होते. सुमारे अडीच लाख क्विंटलचे लिलाव झाले नव्हते. निर्यातबंदी कायम ठेवत केंद्र सरकारने नाफेड आणि 'एनसीसीएफ'च्या माध्यमातून कांदा खरेदीला सुरुवात केली. हा कांदा सध्या पूर्ण क्षमतेने संपूर्ण देशात पाठवला जात आहे. ज्या बाजार समित्यांमध्ये व्यापारी माल पाठवतात, तेथेच सरकारचा कांदा जातो. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मालास मागणी नसल्याचा दावा व्यापारी संघटनेने करत बहिष्कार पुकारला आहे. व्यापाऱ्यांनी ही स्थिती पणनमंत्र्यांसह शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

नाफेड आणि 'एनसीसीएफ'ने साठवणूक केलेला पाच लाख मेट्रिक टन कांदा शिधावाटप दुकानांमार्फत वाटप करावा. सरकारने दैनंदिन बाजारात प्रतिक्विंटलला २४१० रुपये किंवा त्याहून अधिक दर देऊन कांदा खरेदी करावा आणि विक्री शिधावाटप दुकानातून करावी आदी मागण्या व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांबरोबरील बैठकीत मांडल्या होत्या.

या मागण्यांसाठी बंद

१) नाफेड, एनसीसीएफचा कांदा थेट बाजारात विक्री करू नये

२) ग्राहकांना रेशनमार्फत खरेदी केलेला कांदा द्यावा

३) कांद्यावर लादलेले 40 टक्के निर्यात शुल्क रद्द करावे

४) एक टक्का बाजार फी अर्धा टक्का करावी

५) संपूर्ण देशात विक्रेत्याकडून चार टक्के आडत घ्यावी

६) मार्केट शुल्काचा दर प्रतिशेकडा 100 रुपयांस 1 रुपयाऐवजी 0.50 पैसे दर करावा

७) कांदा व्यापारावर सरसकट ५ टक्के अनुदान द्यावे

८) देशांतर्गत वाहतुकीवर सरसकट ५० टक्के अनुदान व्यापाऱ्यांना द्यावे

९) कांदा व्यापाऱ्याांची चौकशी बाजारभाव कमी असताना करा

१०) बाजारभाव वाढल्यानंतर व्यापाऱ्यांची चौकशी अजिबात नको

व्यापाऱ्यांवर कारवाई करणार : सत्तार

ऐन सणासुदीच्या काळात नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बेमुदत बंद करण्याचा जो निर्णय घेतला तो योग्य नाही. येत्या २६ तारखेला व्यापाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे ठरले होते. मात्र, लिलाव बंद ठेवल्याने संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे आदेश दिल्याची माहिती पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

एकीकडे व्यापाऱ्यांचा बहिष्कार, तर दुसरीकडे नाफेडमार्फतची खरेदी लासलगाव केंद्रांवर बंद असल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांची अडवणूक कायम राहिल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना रास्ता रोको, रेल रोको आंदोलन करेल.

– केदारनाथ नवले, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा शेतकरी उत्पादक संघटना

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT