Latest

सुप्रिया सुळे : ‘सिल्व्हर ओकवरील हल्‍ला तो माझ्या आईवरील हल्ला होता’

अमृता चौगुले

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : कोरोना महामारीमधून देश नुकताच बाहेर येत अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी दिल्ली, तसेच देशातील इतर काही भागांत दोन गटांमध्ये घडलेल्या घटना कलंक लावण्यासारख्या आहेत. त्‍यामुळे देशात होणाऱ्या विदेशी गुंतवणुकीवर याचा परिणाम होत आहे, असे खासदार सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्‍हणाल्‍या.

पुढे बोलताना त्‍या म्‍हणाल्‍या, दंगलीमध्ये केवळ सर्वसामान्यांचेच नुकसान होते. सध्या देशामध्ये जी परिस्थिती आहे, ती अस्वस्थ करणारी आहे. कोरोना महामारीमधून देश हळूहळू पूर्ववदावर येत आहे. आणि आता देशाची अर्थव्यवस्था रुळावर येत असताना अशा घटना घडणे, हे कोणत्याही पक्षाला, आणि सरकारला आवडणारे नाही. देशातील अशी अस्थिरता देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी ठरत आहे. तसेच आज देशात महागाई हा गंभीर विषय आहे. आम्‍ही महागाईवर सातत्याने बोलत असतो. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल तसेच गॅसचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहे, असे सुप्रिया सुळे म्‍हणाल्‍या.

राज ठाकरे काही दिवसांपासून सातत्याने पवार कुटूंबियांवर हल्ले करत आहेत. यावर त्‍या म्हणाल्या, आमच्या कुटूंबावर टिका होणे म्हणजे राज्यामध्ये मोठी बातमी असते. अशा प्रकारची टिका म्हणजे म्हणजे आमचे नाणे हे ५५ वर्षांपासून खणखणीत आहे हे सिद्ध होते. मात्र भोंगा प्रकरण, औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची होणारी सभा यावर मात्र सुळे यांनी स्पष्ट बोलणे टाळले.

केंद्र सरकारचा धाडींचा विक्रम : देशमुखांवर १०३ वेळा धाडी

केंद्र सरकारने धाडींचा विक्रम केला आहे. अनिल देशमुख यांच्यावर १०३ वेळा धाडी टाकल्‍या आहेत. हा एक विक्रमच आहे. पण या धाडी कशासाठी होत्या? तसेच देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांचा आरोप होता, त्यातून पुढे काय सिद्ध झाले? असा सवाल त्‍यांनी उपस्‍थित केला.

सिल्व्हर ओक म्‍हणजे माझ्या आईवर हल्ला

संपूर्ण देश, राज्य ही आमची आई आहे. सिल्व्हर ओकवर तो हल्‍ला झाला तो माझ्या आईवर हल्ला होता. ज्या महिलांनी हल्ला केला त्यांना मला भेटायचं आहे. तसेच मी या संदर्भात पोलीस यंत्रणेला विनंती केली आहे. त्‍यांना भेटून त्या महिला अशा का वागल्या? हे मला समजून घ्यायचे आहे. ही मराठी संस्कृतीच नाही, हे समजून घेणे माझी जबाबदारी आहे, असे सुळे सुप्रिया म्‍हणाल्‍या.

हेही वाचा  

SCROLL FOR NEXT