Latest

‘पुढारी’चे राष्ट्रीय कार्यातील योगदान गौरवास्पद : शंभूराज देसाई

अविनाश सुतार

ढेबेवाडी, पुढारी वृत्तसेवा : दैनिक 'पुढारी' केवळ वर्तमानपत्र नाही, तर सामाजिक बांधिलकी जोपासत राष्ट्रीय कार्यात योगदान दिले आहे. दैनिक 'पुढारी'चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे सार्वजनिक जीवनातील योगदान कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी काढले.

कोळे (शिंगणवाडी) (ता. कराड) येथील जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने अनाथ मुलांसाठी चालविलेल्या वसतिगृहाला दैनिक 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी दिलेल्या एक लाख एक हजार रूपयांच्या मदतीचा धनादेश वसतिगृहाचे संचालक समीर नदाफ यांना मंत्री देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास काँग्रेसचे राज्य सरचिटणीस व रयत साखर कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड. उदयसिंह पाटील, शिंगणवाडीचे सरपंच विकास शिंगण, कोळेच्या सरपंच संगीता कराळे, उपसरपंच समाधान शिणगारे, पुढारी कराड कार्यालयाचे प्रमुख सतीश मोरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राहुल शेडगे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

शंभूराज देसाई म्हणाले, 'पुढारी'ने सियाचिनसारख्या उंच आणि बारमाही बर्फाच्छादित विभागात सैनिकांसाठी भव्य हॉस्पिटल उभारले. ते राष्ट्राला समर्पित केले. सैनिकांसाठी खूप मोलाचे काम त्यांनी केले आहे. अतिवृष्टी व पूरकाळात मदतीसाठी 'पुढारी' धावून गेला आहे. त्यातून हजारो संकटग्रस्तांना मदत झाली. 'पुढारी'ने नेहमी सेवाभाव जपला आहे. जिजाऊ वसतिगृहाला शासकीय पातळीवर आवश्यक सहकार्य करण्याचे अभिवचन देसाई यांनी यावेळी दिले.

अ‍ॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, दादासाहेब उंडाळकर स्मारक समितीचा दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार 'पुढारी'चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना समारंभपूर्व प्रदान करण्यात आला आहे. पुरस्काराची रक्कम पन्नास हजार रूपये होती. यामध्ये ५१ हजार रूपये घालून एक लाख एक हजार रूपयांचा धनादेश वसतिगृहाला मदत म्हणून त्यांनी दिला आहे. समाजातून जमा होणारी मदत विद्यार्थ्यांच्या जडणघडीत महत्वपूर्ण ठरणार आहे. हे योगदान विसरता येण्यासारखे नाही.

समीर नदाफ म्हणाले, वारांगणा, गरीब कुटुंबातील तसेच वेडसर मातांची मुले वसतिगृहात आहेत. या मुलांना आधार देण्याचे काम वसतिगृहाच्या माध्यमातून होत आहे. सुरुवातीला अडचणी आल्या, पण आता समाजाचा मदतीचा हात मिळत आहे. सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणले आहे. त्यांच्यासाठी भविष्यात उद्योग-व्यवसाय निर्मिती करण्याचा विचार आहे. वसतिगृहाची जागा अपुरी पडत असल्याने शासन पातळीवर मदत व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 'पुढारी'चे ढेबेवाडी प्रतिनिधी विठ्ठल चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. आभार उपसंपादक अशोक मोहने यांनी मानले.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT