Latest

आरोग्य भरती पेपरफुटीप्रकरणातील आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

आरोग्य विभागातील गट (ड) संवर्गातील पदाच्या पेपरफुटी प्रकरणी सायबर पोलिसांनी 20 जणांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या साधनांमधून सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने आरोपींविरोधात हे 3 हजार 816 पानी दोषारोपपत्र न्यायालयापुढे सादर करण्यात आले आहे.

विजय प्रल्हाद मुर्‍हाडे (वय 29), अनिल दगडू गायकवाड (वय 31), सुरेश रमेश जगताप (वय 28), बबन बाजीराब मुंढे (वय 48), संदीप शामराव भुतेकर (वय 38), प्रकाश दिगंबर मिसाळ (वय 40), उध्दव प्रल्हाद नागरगोजे (वय 26), प्रशांत व्यंकटराव बडगिरे (वय 50), डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड (वय 36), शाम महादू मस्के (वय 38), राजेंद्र पांडूरंग सानप (वय 51), महेश सत्यवान बोटले (वय 53), नामदेव विक्रम करांडे (वय 33), उमेश वसंत मोहिते (वय 24), अजय नंदू चव्हाण (वय 32), कृष्णा शिवाजी जाधव (वय 33), अंकीत संतोष चनखोरे (वय 23), संजय शाहूराव सनाप (वय 40), आनंद भारत डोंगरे (वय 27), अर्जुन भरत बमनावत उर्फ राजपुत (वय 30) अशी त्यांची नावे आहेत.

आरोपींमध्ये राज्यभारातील कर्मचारी व अधिकारी

दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नेव्हल डॉकयार्डमधील खलाशी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक, लातूर येथील सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी, भूम येथील ग्रामीण रुग्णायातील क्लार्क, आंबेजोगाई मेंटल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक आदींचा समावेश आहे. त्यांच्यासह अन्य आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम 406, 420, 409, 120-ब, 201, 34 सह महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परिक्षांमध्ये होणार्‍या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम (1990 सुधारीत) कलम 3, 5, 6, 8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, आर्थिक व सायबर गुन्हे पोलीस उपआयुक्त भाग्यश्री नवटके, सहायक आयुक्त विजय पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके व पोलीस निरीक्षक मिनल सुपे-पाटील यांनी केली.

100 पैकी 92 प्रश्नांची उत्तरे केली प्रसारीत

पोलिसांनी आजवर केलेल्या तपासामध्ये प्रश्नपत्रिकेतील शंभर पैकी तब्बल 92 प्रश्न फोडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याची माहिती इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे प्रसारीत केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या साधनांचे विश्लेषण करून सबळ पुरावा प्राप्त करून सायबर पोलिसांनी आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT