नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : एचसीएल टेक्नॉलॉजीसच्या (HCL Technologies) चेअरमन रोशनी नादर मल्होत्रा ह्या सलग दुसऱ्या वर्षी भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत. त्यांच्याकडे ८४,३३० कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर ई-कॉमर्स फर्म Nykaa च्या संस्थापक फाल्गुनी नायर (Falguni Nayar) 'बायोकॉन'च्या संस्थापक- अध्यक्ष किरण मुझुमदार-शॉ (Kiran Mazumdar-Shaw) यांना मागे टाकून दुसऱ्या स्थानी आहेत. फाल्गुनी नायर ५७,५२० कोटी रुपयांच्या संपत्तीसह भारतातील उद्योग जगतात स्वबळावर भरारी घेणाऱ्या श्रीमंत महिला बनल्या आहेत.
भारतातील १०० सर्वात श्रीमंत महिलांची संपत्ती २०२० च्या तुलनेत ३०० कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत महिला सांभाळत असलेल्या उद्योगांची उलाढाल आणि त्यांची संपत्ती यांची माहिती 'Kotak Private Banking Hurun – Leading Wealthy Women List'मध्ये संकलित केली जाते. २०२१ च्या यादीतील महिलांची सरासरी संपत्ती ४,१७० कोटी रुपये आहे जी याआधी सरासरी २,७२५ कोटी रुपये होती. श्रीमंताच्या यादीतील टॉप १०० महिलांची संपत्ती जीडीपीच्या २.८ टक्के एवढी आहे.
पेप्सिकोच्या इंद्रा नूयी (५,०४० कोटी) यांच्यासह तीन उद्योजक महिलांनी या यादीत स्थान मिळवले आहे. यात एचडीएफसीच्या रेणू सुद कर्नाड (८७० कोटी) आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शांती एकंबरम (३२० कोटी) यांचा समावेश आहे. स्ट्रीमिंग डेटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या सह-संस्थापक नेहा नारखेडे (१३,३८० कोटी संपत्ती) ह्या आघाडीवर असलेल्या यादीत २५ नवीन चेहरे आहेत. 'हुरुन ग्लोबल U४० सेल्फ-मेड अब्जाधीश यादी २०२२' मध्ये स्थान मिळवणारी त्या एकमेव भारतीय महिला आहेत.
आठ स्टार्टअप संस्थापकांमध्ये Byju's च्या दिव्या गोकुलनाथ (३६) आणि Of Business च्या रुची कालरा (३८) यांची अनुक्रमे ४,५५० कोटी आणि २,६०० कोटी रुपयांची संपत्ती आहे.