Latest

पुणे : वाळू माफियांच्या विरोधात हवेलीच्या महिला तहसीलदार थेट नदीपात्रात

अमृता चौगुले

लोणी काळभोर : पुढारी वृत्तसेवा

मुळा-मुठा नदीपात्रातील कोलवडी, हिंगणगाव, आष्टापुर आदी भागात बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियावर सोमवारी (दि. ७) रात्री १२ वाजता छापा टाकण्यात आला. यामध्ये वाळू अड्डे उध्वस्त करुन मोठी कारवाई करण्यात आली. ही कारवाई हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या नैतृत्वातील पथकाने केली.

पुर्व हवेली तालुक्यात मुळा-मुठा नदीपात्रात या भागातील वाळू माफिया बेकायदा वाळू ऊपसा करीत होते. हे वाळू माफिया येथील वाळू रात्री १२ वाजेनंतर ते पहाटे ६ वाजेपर्यंत उपसा करीत होते. नदीपात्रातील वाळूचे लिलाव झाले नाहीत, तरीही बेकायदा वाळू उपसा करणारे वाळू माफिया हे रोज नदीचे लचके तोडत असल्याची माहिती हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना मिळाली. त्यांनी एक पथक तयार करुन लोणी काळभोरच्या दिशेने येऊन कोलवडी, आष्टापुर, हिंगणगाव येथे प्रवेश केला.

थेट नदीपात्रात प्रवेश

या कारवाईची माहिती गुप्त ठेवून स्थानिक महसूल अधिकाऱ्यांना या पथकात सहभागी न करता थेट नदीपात्रात प्रवेश केला. तहसीलदार तृप्ती कोलते आल्यानंतर वाळू माफियानी पळ काढला. कोलते यांनी अंधारात नदीपात्रातील वाहनांचा पाठलाग केला व वाळू उपशासाठी वापरण्यात आलेली वाहने पकडली. यामध्ये एक पोकलेन मशीन व ट्रॅक्टर जप्त केला. याचा पंचनामा करुन स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले.

नदीपात्रातील बेकायदा वाळू ऊपसा करणार्या वाळू माफियांवर तहसीलदार कोलते यांनी केलेल्या कारवाईमुळे वाळू माफिया रॅकेटचे धाबे दणाणले आहे, तर कोलते यांच्या या दबंग कारवाईचे हवेली तालुक्यात कौतुक होत आहे. यापुढेही हवेली तालुक्यात कोठेही बेकायदा वाळू ऊपसा होत असेल तर नागरिकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा, त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल व तात्काळ कारवाई करण्यात येईल व या वाळू माफियाचे रॅकेट हवेली तालुक्यात उध्वस्त करणार असल्याचे तहसीलदार तृप्ती कोलते यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT