Latest

Hangzhou 2022 Asian Games | हॉकीत भारतीय महिलांनी सिंगापूरचा उडवला धुव्वा, डागले १३ गोल, संगिता कुमारीची हॅट्ट्रिक

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला हॉकी संघाने साखळी सामन्यात सिंगापूरचा १३ -० ने धुव्वा उडवत त्यांच्या मोहिमेची दमदार सुरुवात केली. भारतीय महिला हॉकी संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे. आज त्याचा सलामीचा सामना सिंगापूरशी झाला. कर्णधार सविता पुनियाच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आज सिंगापूरला एकही गोल करण्याची संधी दिली नाही. (Hangzhou 2022 Asian Games)

या विजयासह भारतीय महिला हॉकी संघाने पूल ए मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. प्रत्येक पूलमधील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

 संबंधित बातम्या 

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन (FIH) च्या क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने ३४व्या स्थानी असलेल्या सिंगापूरवर सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. सामन्याच्या पाच मिनिटांत भारताला पेनल्टी कॉर्नर देण्यात आला आणि उदिताने सिंगापूरच्या गोलकीपरवर ड्रॅग-फ्लिक करून आघाडी घेतली.

सुरुवातीच्या धक्क्यातून सिंगापूर सावरण्याआधीच भारताच्या सुशीला चानू पुखरामबम आणि दीपिका यांनी आणखी दोन गोल केले. सुरुवातीच्या क्वार्टरच्या शेवटच्या मिनिटांत नवनीत कौरने दोन गोल करत भारताला ५-० अशा आघाडीवर नेले.

भारतीय संघाने दुसऱ्या क्वार्टरची सुरुवात सिंगापूरवर वर्चस्व कायम ठेवतच केली. दीप ग्रेस एक्का आणि नेहा यांनी भारताच्या खात्यात आणखी दोन गोलची भर घातली. मध्यंतरापर्यंत भारत ८-० ने आघाडीवर राहिला.

भारतीय संघाने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखले आणि उत्तरार्धातही गोल करणे सुरुच ठेवले. सलीमा टेटे, संगीता कुमारी, वंदना कटारिया आणि मोनिका यांनी शेवटच्या दोन क्वार्टरमध्ये पाच गोल नोंदवून भारताला मोठा विजय मिळवून दिला. संगिता कुमारीने हॅट्ट्रिक पूर्ण केली.

भारतीय महिला संघ १९८२ पासून आशियाई क्रीडा स्पर्धेत नियमितपणे सहभागी होत आहे, जिथे त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. मागील जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ मध्ये भारतीय महिला संघाला रौप्यपदक मिळाले होते.

SCROLL FOR NEXT