Latest

Ramlala Pran Pratishtha | गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, आणखी एका आमदाराचा राजीनामा, राम मंदिर सोहळ्याचे सांगितले कारण

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराचे उद्घघाटन आणि रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे देशभरात भक्तीमय वातावरण आहे. या सोहळ्यावरून राजकारणही शिगेला पोहोचले आहे. काँग्रेसने राम मंदिर उद्घाटन आणि रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारले आहे. आता या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षांतर्गत असंतोष दिसून येत आहे. गुजरातमधील काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार सी. जे. चावडा (Gujarat Congress MLA CJ Chavda) यांनी शुक्रवारी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. कारण राम मंदिराच्या मुद्यावरून पक्षाने घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी नाराज व्यक्त केली आहे. (Ramlala Pran Pratishtha)

विजापूर मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेल्या सी. जे. चावडा यांनी गांधीनगरमध्ये विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला, असे राज्य विधानसभेच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

आमदारकीच्या राजीनाम्यावर सी. जे. चावडा म्हणाले की, "मी काँग्रेसमधून राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमध्ये २५ वर्षे काम केले. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेमुळे संपूर्ण देशातील जनता आनंदात आहे. लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या आनंदाच्या सोहळ्यात सहभाग होण्याऐवजी काँग्रेसने घेतलेली भूमिका नाराज करणारी आहे."

"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोन दिग्गज गुजरातच्या नेत्यांच्या कामांना आणि त्यांच्या धोरणांना आपण पाठिंबा द्यायला हवा. पण काँग्रेसमध्ये असताना मी ते करू शकलो नसतो. म्हणून मी राजीनामा दिला," असेही ते पुढे म्हणाले.

चावडा यांच्या राजीनाम्याने १८२ सदस्यसंख्या असलेल्या गुजरात विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ आता १५ झाले आहे. चावडा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. पण, अद्याप याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही. यापूर्वी आनंद जिल्ह्यातील खंभात येथील काँग्रेसचे आमदार चिराग पटेल यांनीही राजीनामा दिला होता. (Ramlala Pran Pratishtha)

दरम्यान, राम मंदिरात 'प्राण प्रतिष्ठा' सोहळा २२ जानेवारीला होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी राम मंदिर लोकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT