नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात एकत्रित निवडणुकांच्या एक देश एक निवडणूक प्रस्तावाला काँग्रेसने ठाम विरोध केला आहे. सर्व निवडणुका एकाचवेळी घेण्याचा प्रकार म्हणजे संघराज्य व्यवस्थेने दिलेल्या हमीच्या आणि राज्यघटनेच्या मुलभूत चौकटीच्या विरोधात असल्याचे टिकास्त्र काँग्रेसने सोडले आहे. यासाठी नेमलेली उच्चस्तरीय समिती देखील बरखास्त करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसने केली आहे.
एकत्रित निवडणुकांसाठीच्या संभाव्य व्यवस्थेबाबत चाचपणी करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक देश एक निवडणूक समिती नेमण्यात आली आहे. या समितीने मागील वर्षी १८ ऑक्टोबरला सर्व राजकीय पक्षांना पत्र पाठवून एकत्रित निवडणुकांच्या प्रस्तावावर अभिप्राय मागविले होते. या पत्राला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज उत्तर देताना एकत्रित निवडणुकांचा प्रस्ताव उडवून लावला.
समितीचे सचिव नितीन चंद्रा यांना पाठविलेल्या पत्रात खर्गे यांनी एकत्रित निवडणुकांची संकल्पनाच अनाठायी ठरविली आहे. तसेच, घटनात्मक व संसदीय लोकशाहीला हरताळ फासण्यासाठी केंद्र सरकारला माजी राष्ट्रपतींनी स्वतःचा आणि या पदाचा गैरवापर करू देऊ नये, असे आवाहनही खर्गे यांनी या पत्रात केले आहे.
खर्गे यांनी पत्रात म्हटले आहे, की एक देश एक निवडणूक या संकल्पनेलाच मुळात काँग्रेसचा ठाम विरोध आहे आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी ही संकल्पना व त्यासाठी नेमलेली उच्चस्तरीय समिती बरखास्त करावी. एकत्रित निवडणुकांसारख्या लोकशाहीविरोधी प्रस्तावांबद्दल बोलून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याऐवजी जनादेशाचा आदर राखण्यासाठी सरकार, संसद आणि निवडणूक आयोगाने एकत्रित काम करावे, असा उपरोधीक सल्लाही त्यांनी या पत्राद्वारे दिला आहे.
हेही वाचा :