Latest

GT vs MI : टायटन्सविरुद्ध लढतीपूर्वी मुंबई इंडियन्ससमोर गोलंदाजीत मुख्य चिंता

Shambhuraj Pachindre

अहमदाबाद; वृत्तसंस्था : सलग तीन विजयानंतर पंजाबविरुद्ध मागील लढतीत पराभव पत्करावा लागलेला मुंबई इंडियन्सचा संघ आज गुजरात टायटन्सविरुद्ध लढताना पुन्हा विजयपथावर परतण्यासाठी प्रयत्नशील असेल. मात्र, यासाठी त्यांना सर्वप्रथम गोलंदाजीतील बर्‍याच समस्यांचे निराकरण करावे लागणार आहे. नेहमीप्रमाणे आयपीएलमध्ये खराब सुरुवात करणार्‍या या संघाने नंतर हॅट्ट्रिक विजय नोंदवली, पण शनिवारी मुंबईतच झालेल्या लढतीत पंजाब किंग्जने त्यांना 13 धावांनी पराभवाचा जोरदार धक्का दिला. (GT vs MI)

मुंबईला पंजाबविरुद्ध लढतीत शेवटच्या षटकातील गोलंदाजीने दगा दिला. शेवटच्या पाच षटकांत पंजाबच्या फलंदाजांनी तब्बल 96 धावांची आतषबाजी केली आणि निर्धारित 20 षटकांत 8 बाद 214 धावांचा डोंगर रचला. आता गुजरातविरुद्ध लढतीत या आघाडीवर मुंबईला दक्ष राहावे लागेल. (GT vs MI)

त्या लढतीत अर्जुन तेंडुलकर, जेसॉन बेहरेनडॉर्फ, कॅमेरून ग्रीन व जोफ्रा आर्चर यांची बरीच धुलाई झाली. यातील प्रत्येकाला आपल्या षटकांचा कोटा पूर्ण करता करता अगदी 40 पेक्षा अधिक धावा मोजाव्या लागल्या. अनुभवी पीयुष चावला व त्याचा सहकारी फिरकीपटू ऋतिक शौकिन यांनी मात्र त्या तुलनेत बराच नियंत्रित मारा केला. धावा रोखण्याच्या बाबतीतही ते यशस्वी ठरले.

आघाडीचे व मधल्या फळीतील फलंदाज सातत्यपूर्ण योगदान देत असल्याने मुंबई इंडियन्सची फलंदाजी आघाडी फळी आपली कामगिरी उत्तम पार पडत असल्याचे चित्र आहे. रोहित शर्मा व इशान किशन यांनी बर्‍याचदा उत्तम सुरुवात करून दिली असून सूर्यकुमार यादवला सूर सापडला, हे मुंबईला मोठा दिलासा देणारे ठरले आहे. कॅमेरून ग्रीन व टीम डेव्हिड या विदेशी खेळाडूंनी देखील लक्षवेधी वाटा उचलला आहे. पंजाबविरुद्ध अर्शदीप सिंगच्या स्वप्नवत षटकापूर्वी तर ग्रीन व सूर्यकुमार यादव यांनी 36 चेंडूंत 75 धावांची आतषबाजी करत मुंबईला जवळपास सामना जिंकून दिलाच होता. आता, गुजरातची गोलंदाजी तगडी असल्याने येथेही मुंबईसमोर कडवे आव्हान असणार आहे.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT