Latest

Konkan Travel : रत्नागिरीतील ‘मालगुंड’ला कधी गेलाय का? ही सुंदर ठिकाणे पाहा…

स्वालिया न. शिकलगार

स्वालिया शिकलगार – पुढारी ऑनलाईन डेस्क : आमचा महाराष्ट्र सह्याद्रीच्या डोंगररांगानी व्यापलेला आहे. (Konkan Travel ) महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टी आणि डोळ्यात न मावणारा निसर्गाचा ठेवा, आमच्याकडे आहे. हा अनमोल ठेवा जपत महाराष्ट्राची भटकंती तर करायलाच हवी.  या सुंदर ठिकाणांपैकी एक रत्नागिरी जिल्हा. त्यामधील सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे गणपतीपुळे. पण, तुम्हाला माहितीये का गणपतीपुळ्याजवळ अनेक रमणीय आणि सुंदर अशी पर्यटनस्थळे आहेत, जिथे तुम्ही भेट देऊ शकता. तुम्ही जर गणपतीपुळेला गेला तर या पुढील ठिकाणांना नक्की भेट द्या. (Konkan Travel )

गणपतीपुळे मंदिर

गणपतीपुळे – रत्नागिरी जिल्ह्यातील हे एक धार्मिक पर्यटनस्थ‍ळ आहे. येथे स्वयंभू गणपतीचे मंदिर असून ते ४०० वर्षांपेक्षा जुने असल्याचे म्हटले जाते. कोकण किनारपट्टीवर गणपतीपुळे असून एका बाजूला सह्याद्रीच्या रांगा आणि दुसऱ्या बाजूला विशाल अरबी समुद्र आहे. जवळपास मालगुंड आणि जयगड ही गावेदेखील प्रसिद्ध आहेत, जेथे तुम्ही भेट देऊ शकता. येथे वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध आहे. शिवाय घोडागाडीमधून तुम्हाला समुद्र किनारी फेरफटका मारता येतो. (Konkan Travel )

कसे जाल – कोल्हापूर – बांबवडे- मलकापूर-कोल्हापूर रत्नागिरी मार्ग-आंबा घाट-साखरपा-चाफे-नेवरे फाटा-गणपतीपुळे

मालगुंड गाव

मालगुंड – कवी केशवसूत यांचे घर तुम्हाला मालगुंड गावात पाहायला मिळेल. शिवाय त्यांची साहित्यसंपदा आणि वाचनासाठी ग्रंथालयदेखील घराला लागून दिमाखात उभे आहे. अस्सल कोकणी पद्धतीच्या या घरात तुम्हाला आतमध्ये जाऊन पाहता येते. कवी केशवसुतांचे जन्मस्थान मालगुंड आहे.

कसे जाल- गणपतीपुळेपासून १ किलोमीटर अंतरावर मालगुंड आहे.

आरे-वारे बीच – हे दोन जुळे सुंदर समुद्रकिनारे आहेत. पांढऱ्या वाळूमुळे हे किनारे आपले लक्ष वेधून घेतात.

कसे जाल- गणपतीपुळे पासून आरे वारे अर्धा तासांच्या अंतरावर आहे. मंदिर व्ह्यू पॉईंट-आरे वारे रोड- आरे वारे ब्रीज-आरे वारे किनारा.

गावखडी

गावखडी बीच – दाट सुरुची वने आणि सुंदर निखळ समुद्रकिनरा या ठिकाणी पाहायला मिळतो. रत्नागिरीहून राजापूर रस्त्यावरून प्रवास करताना, पूर्णगडचा खाडी पूल ओलांडला की गावखडीचा समुद्र नजरेत भरतो. गावखडी समुद्रकिनारा अंदाजे १ किमी लांब आहे. गावखडी समुद्रकिनाऱ्याच्या उजवीकडे मुचकुंडी नदी आहे. तेथून तुम्ही पूर्णगड किल्ला पाहू शकता.

कसे जाल – पावस ते गावखडी हे अंतर ९ किमी आहे. गणपतीपुळेपासून हे अंतर दीड तासांचे आहे. गणपतीपुळे मंदिर-आरे-मुसलमानवाडी-गोलप-गावखडी बीच.

पूर्णगड किल्ला – गावखडी बीचला जाताना तुम्ही पूर्णगडला जाऊ शकता. जाताना तुम्ही रनपार समुद्रकिनारा आणि वायंगणी बीचलादेखील भेट देऊ शकता.

गणेशगुळे – या गावाला निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभला आहे. येथे पर्यटकांसाठी निवास-भोजन अशा सर्व सोयी झाल्या आहेत. येथील रमणीय परिसरामुळे अनेक चित्रपटांचे व मालिकांचे शूटिंग या भागात होत असते.

कसे जाल – गणपतीपुळेपासून गणेशगुळेपर्यंत दीड तासांचा रस्ता आहे. गणपतीपुळे-भंडारवाडा-आरे वारे रोड-गंजुर्डा-सुभाष रोड- सी लिंक – गणेशगुळे रोड-गणेशगुळे.

पावस – हे ठिकाण स्वामी स्वरुपानंद यांच्या आश्रमासाठी प्रसिद्ध आहे.

कसे जाल – गणपतीपुळेपासून ४१ किमी. अंतरावर पावस आहे.

थिबा पॅलेस

थिबा पॅलेस – हे पॅलेस पाहण्यासारखे असून गणपतीपुळे पासूनचे अंतर १ तासांचे आहे.

कसे जाल – गणपतीपुळे-भंडारवाडा-आरे वारे रोड -गंजुर्डा-थिबा पॅलेस.

जयगड – जयगडचा किल्ला पाहण्यासाठी अनेक पर्यटक, निसर्गप्रेमी आणि इतिहास अभ्यासक, संशोधक येथे येत असतात. हा किल्ला १६ व्या शतकातील आहे. येथे लाीटहाऊसदेखील आहे.

कसे जाल – गणपतीपुळेपासून २० किमी अंतरावर शास्त्री खाडीजवळ हा किल्ला दिमाखात उभा आहे.

जय विनायक मंदिर – जयगड येथील जय विनायक मंदिर प्रसिद्ध ठिकाण आहे. अनेक भाविक येथे भेट देत असतात. जर तुम्ही रत्नागिरीत आला तर या स्थळाला नक्की भेट द्या.

कसे जाल- जय विनायक मंदिराला जाण्यासाठी अर्धा तासाचा वेळ लागतो. गणपतीपुळे-आरे वारे रोड- जय विनायक मंदिर

रत्नदुर्ग किल्ला – रत्‍नदुर्ग हा रत्‍नागिरी शहरापासून अवघ्या २-३ कि.मी. वर आहे. रत्‍नदुर्ग हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण आहे. येथे सुंदर भगवती मंदिर आहे. येथून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे.

कसे जाल – गणपतीपुळे-आरे रोड- गंजुर्डा-रत्नदुर्ग किल्ला

रत्नदुर्गला जाताना तुम्ही रत्नागिरी मरीन फिश म्युझियम देखील पाहू शकता.

वर्षभर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. पण उन्हाळ्यात येथील तापमान जास्त असते. म्हणून ऑक्टोबर ते मार्चपर्यंत तुम्ही या ठिकाणांना भेट देऊ शकता.

थिबा पॅलेस

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT