Latest

BRS In Maharashtra : बीआरएसकडून पुस्तके आली, मात्र सदस्य नोंदणीचा पत्ता नाही

backup backup

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव (K. Chandrasekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती (Bharat Rashtra Samiti) या पक्षाची सोलापुरात उभारणी करण्यासाठी साहित्य आले खरे, पण सदस्य नोंदणीचा अद्याप पत्ता नाही. दुसरीकडे पक्षाच्या प्रचार-प्रसार प्रचाराचे अभियान देखील राबविले जात नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. (BRS In Maharashtra)

गत चार महिन्यांपासून सोलापुरात या पक्षाची उभारणी करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. सोलापुरात तेलुगू समाजबांधवांची मोठी संख्या लक्षात घेऊन केसीआर यांनी सोलापूरवर विशेष लक्ष केंद्रीत केले होते. माजी खासदार धर्मण्णा सादूल, माजी महापौर महेश कोठे, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांना या पक्षात घेण्यासाठी केसीआर यांनी खास दूूत सोलापूरला धाडले. मात्र केवळ सादूलच त्यांना गळाला लागले. कोेठे यांनी या पक्षात येण्यास स्पष्टपणे नकार दिला, तर गोप यांनी 'वेट अ‍ॅण्ड वॉच'ची भूमिका घेतली आहे. (Formation of BRS party in Maharashtra-Solapur)

या पार्श्‍वभूमीवर सोलापुरातील सादूल यांच्याव्यतिरिक्त इतर काही जणांनी या पक्षात प्रवेश केला, तरी अद्याप या पक्षाची उभारणीचे काम सुरू झाले नाही. या पक्षाचे सोलापुरात कार्यालय सुरू करून पक्षाचा प्रचार-प्रसार सुरू करण्याची गरज आहे. नुकतेच नांदेडमध्ये झालेल्या पक्षाच्या शिबिरात केसीआर यांनी या पक्षाच्या संघटन बांधणीबरोबरच 22 मे ते 22 जून या कालावधीत प्रचार-प्रसाराचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर पक्षाकडून माहितीपत्रक, पक्षध्वज, उपरणे, बिल्ले, टॅब, सदस्य नोंदणी पुस्तिका आदी साहित्य सोलापुरात दाखल झाले. या साहित्याची पूजादेखील करण्यात आली, मात्र दहा दिवस उलटले तरी अद्याप सदस्य नोंदणी वा प्रचार-प्रसाराचे काम सुरू झाले नाही. याबद्दल पूर्व भागातून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. (BRS In Maharashtra)

सोलापूर महापालिकेत बीआरएसला मोठी संधी | BRS In Solapur Election

सोलापूर महापालिकेची निवडणूक आगामी काळात होणार आहे. या निवडणुकीत चुणूक दाखविण्याची मोठी संधी बीआरएसला आहे. पूर्व भागात करिश्मा दाखविण्यास या पक्षाला नामी संधी आहे, मात्र पक्ष उभारणीच्या कामाचा श्रीगणेशाच झालेला नाही, हे येथे उल्‍लेखनीय. चौकट सुसंवाद व समन्वयाचा अभाव एकंदर बीआरएसची महाराष्ट्रभर सर्वत्र मोठी चर्चा होत असताना सोलापुरात मात्र नेते, कार्यकर्त्यांमध्ये मरगळ असल्याचे चित्र नाही. ठोस कार्यक्रम, सुसंवाद व समन्वयाचा अभाव दिसून येतो. त्यामुळे या पक्षाची सोलापुरात प्रभावीपणे उभारणी होईल की नाही याविषयी साशंकता आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT