प्रशांत नवगिरे यांचा ‘बीआरएस’मध्ये प्रवेश; तेलंगणाचे मुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी सरसावलेल्या भारत राष्ट्र समितीने धाराशिव जिल्ह्यात पाय रोवले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांना पक्षात घेतले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी प्रशांत नवगिरे यांचे स्वागत केले. नवगिरे हे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटचे कार्यकर्ते होते.
प्रशांत नवगिरे यांनी मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरेंसोबत काम करणे पसंद केले होते. महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी सुरुवातीच्या काळात जबाबदारी पार पाडली. त्यानंतर ते पक्षाचे जिल्हा संघटक बनले. तर पाच वर्षांपासून ते जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. राज ठाकरे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख होती. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. दरम्यान, शुक्रवारी (दि. ५) रोजी हैदराबाद येथे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या निवासस्थानी पक्ष प्रवेश करत त्यांनी भारत राष्ट्र समितीचा गुलाबी झेंडा हाती घेतला.
राष्ट्रीय महामार्गाच्या जवळपास १० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामासाठी व जनतेच्या विविध प्रश्नांवर रास्ता रोको, टोलनाका आंदोलन, बचतगटांच्या महिलांसाठी अनेक आंदोलने प्रशांत नवगिरे यांनी केली आहेत. २०१६ मध्ये त्यांनी तुळजापूर तालुक्यात स्वखर्चाने जलसंधारणांची कामे केली होती . ती पाहण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः जळकोट व परिसरात आले होते.
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची जनतेच्या विकासासाठी असलेली दूरदृष्टी, प्रचंड इच्छाशक्ती पाहून आपण या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यापुढे महाराष्ट्रात या पक्षाचे जाळे वाढवून पक्षसंघटन वाढविण्यावर भर राहील असे त्यांनी सांगितले. यावेळी भारत राष्ट्र समिती पक्षाचे आमदार जीवन रेड्डी, प्रविण जेठेवाड, शंकरराव धोंडगे, रणजीत देशमुख यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा :