राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना यांचा बीआरएसमध्ये प्रवेश | पुढारी

राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना यांचा बीआरएसमध्ये प्रवेश

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि छत्रपती संभाजीनगरातील राष्ट्रवादीचे आघाडीचे पदाधिकारी अब्दुल कदीर मौलाना यांनी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. शरद पवारांची साथ सोडून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासोबत गेल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का पोहोचला आहे. याआधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माजी आमदार हर्षवर्धन जाधव, वैजापुरचे राष्ट्रवादीचे विधानसभेचे उमेदवार अभय चिकटगावकर यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केलेला आहे.

अब्दुल कदीर मौलाना हे तब्बल २५ वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय राहिले आहेत. राष्ट्रवादीने त्यांना प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. मात्र, ते तेथे नाराज होते. अखेर त्यांनी के. चंद्रशेखर राव यांच्या व्यक्तिमत्वाला प्रभावित होऊन 3 एप्रिल रोजी बीआरएस पक्षात प्रवेश घेतला. आता राज्यभर हा पक्ष वाढविण्याचा विडा उचलला असल्याचे त्यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, तेलंगणा हे महाराष्ट्राच्या शेजारचे राज्य आहे. तेथील विकास, सिंचन योजना पाहून मी भारावून गेलो. तेलंगणाच्या शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा आहे. महाराष्ट्रात अजूनही १२ तास लोडशेडींग होते. के. चंद्रशेखर राव यांना तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रात क्रांती करायची आहे. त्यांना हा पक्ष देशभर वाढवायचा आहे. त्यामुळे आम्ही त्यांना साथ देणार आहोत.

कोई यूँही बेवफा नही होता!

राष्ट्रवादीची २५ वर्षांची साथ आपण का सोडली? या प्रश्नावर कदीर मौलाना यांनी काहीसा वेळ घेत कुछ तो बात होगी, कोई यू ही बेवफा नही होता. असे उत्तर दिले. त्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर नाराजी आहे का? की स्थानिक आमदारांवर नाराजी आहे? याबाबत विचारले असता त्यांनी मुझे बचा वक्त खराब नही करना है, असे उत्तर देऊन बोलणे टाळले.

प्रवक्ते पदाची जबाबदारी?

अब्दुल कदीर मौलाना यांच्यावर बीआरएसमध्ये महाराष्ट्राची मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. महाराष्ट्राचे प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्याबाबत चर्चा झाली आहे. मात्र, येत्या काही दिवसांमध्ये त्यावर निर्णय घेतला जाईल. संघर्ष करू पण बीआरएस महाराष्ट्रभर वाढवू, असे मौलाना यांनी सांगितले. येत्या काळात बरेच माजी आमदार बीआरएसमध्ये प्रवेश करतील, असा दावाही त्यांनी केला.

Back to top button