Latest

Facebook ला १८ वर्षानंतर तगडा झटका! पहिल्यांदाच डेली यूजर्समध्ये घट, ‘मेटा’चे शेअर धडाधड कोसळले

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

दिग्गज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकला (Facebook) हल्लीच अनेक वादांमुळे टीकेचा सामना करावा लागला. आता तर सोशल मीडियावरील फेसबुकची मक्तेदारी धोक्यात आली आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी हल्लीच त्यांच्या कंपनीचे नाव बदलून मेटा करण्याची घोषणा केली होती. पण यामुळे डेली यूजरमध्ये वाढ न होता त्यात घसरण झाली असल्याचे दिसून आले आहे. फेसबुकच्या १८ वर्षांच्या अस्तित्वानंतर ही पहिलीच अशी वेळ आहे की त्यांचा यूजर बेस कमी झाला आहे.

फेसबुकची पेरेंट कंपनी मेटा (Meta) ने जारी केलेल्या रिपोर्टनुसार, फेसबुकने जागतिक पातळीवर २०२१ च्या चौथ्या तिमाहीत सुमारे ५ लाख यूजर गमावले आहेत. या पार्श्वभूमीवर काही तासांत मेटा प्लेटफॉर्म्स इंक (Meta Platforms Inc) च्या शेअरमध्ये २२ टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली. यूजर्सची संख्या कमी झाल्याने त्यांच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. एवढेच नाही तर कंपनीला मिळणाऱ्या जाहिरातींवर त्याचा परिणाम झाला आहे.

गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत फेसबुकचे २.९१ अब्ज मासिक ॲक्टिव्ह यूजर्स होते. मागील तिमाहीच्या तुलनेत यूजर संख्येत वाढ झालेली नाही. मेटाचे मुख्य वित्त अधिकारी डेव्ह वेहनर (Dave Wehner) यांनी, येत्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात घट होण्याची शक्यता बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती. याचा परिणाम मेटाच्या शेअरवर झाला आहे. मेटाच्या शेअरमध्ये २२.९ टक्क्यांनी घसरून होऊन तो २४९.०५ डॉलरवर आला आहे. यामुळे कंपनीचे भांडवली मुल्य कमी होऊन ते २०० अब्ज डॉलरवर आले आहे.

पहिल्या तिमाहीत कंपनीचा महसूल २७ ते २९ अब्ज डॉलर असू शकतो, असा अंदाज Meta ने बांधला होता. तर विश्लेषकांनी ३०.१५ अब्ज डॉलर महसुलाची अपेक्षा केली होती. मागील वर्षाच्या चौथ्या तिमाहीत महसूल ३३.६७ अब्ज डॉलर होता. तर एक वर्षापूर्वी महसूल २८.०७ अब्ज डॉलर होता.

फेसबुकला Tiktok आणि YouTube ची कडवी टक्कर

कंपनीला Tiktok आणि YouTube ला कडवी टक्कर द्यावी लागत आहे. मोठ्या संख्येने यूजर या प्लॅटफॉर्म्सवर शिफ्ट होत आहेत. Tiktok आणि YouTube सारख्या प्लॅटफॉर्ममुळे मेटाच्या जाहिरातींवर परिणाम होणार असल्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की Apple ने आपल्या ऑपरेटिंग सिस्टमच्या गोपनियतेत बदल केला आहे, ज्यामुळे ब्रँड्सना Facebook आणि Instagram वर जाहिरात करणे कठीण झाले आहे. डेली अ‍ॅक्टिव्ह यूजर बाबत सर्वांधिक नुकसान उत्तर अमेरिकेतून (सुमार १० लाख) झाले आहे. येथून जाहिरातींच्या माध्यमातून अधिक महसूल मिळतो. अहवालात पुढे म्हटले आहे की, व्हॉट्स अॅप आणि इंस्टाग्राम सारख्या इतर मेटा अॅप्समध्येदेखील यूजरची वाढ कमी झाली आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT