फेसबुक : मेटा भारताला बदलणार? रोजगाराची मोठी संधी | पुढारी

फेसबुक : मेटा भारताला बदलणार? रोजगाराची मोठी संधी

फेसबुकने आपल्या ’मेटा’ या नवीन अद्ययावत सेवेसाठी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून भारताकडे मोर्चा वळवला आहे. मेटाच्या येऊ घातलेल्या तंत्रज्ञानामुळे भारतात शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक वाहतूक अशा पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदलून जाणार आहे. मेटा जेव्हा प्रत्यक्षात भारतात काम करू लागेल तेव्हा भारतीय अभियंते, तंत्रज्ञ यांच्यासाठी उपलब्ध होणारा रोजगार ही सर्वात मोठी फायद्याची गोष्ट ठरू शकते.

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी गेल्याच महिन्यात आपल्या कंपनीचे नाव बदलल्याची घोषणा केली. ‘मेटाव्हर्स’ हे नवीन नाव घेऊन आता ही कंपनी सेवा पुरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. याच कार्यक्रमात फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटचं पुढील व्हर्जन लवकरच येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ‘मेटा’ असं या पुढील व्हर्जनचं नाव असेल. तंत्रज्ञान जगतात ‘टॉक ऑफ द टाऊन’ बनलेल्या या ‘मेटा’बद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आजपर्यंत आपण इंटरनेटचा वापर करत होतो म्हणजे मोबाईल फोन, लॅपटॉप, कॉम्प्युटर इत्यादी माध्यमातून इंटरनेटकडे पाहत होतो, ऐकत होतो. हा मजकूर कधी व्हिडीओ, कधी फक्‍त आवाज, तर कधी फक्‍त लिखित अशा स्वरूपाचा असे. पण मेटा नावाच्या या तंत्रज्ञानाच्या भविष्यकालीन आविष्कारात आपण प्रत्यक्ष इंटरनेटमध्ये वावरणार आहोत. आपली दैनंदिन कामे, मीटिंग्ज अशा अनेक गोष्टी या व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीच्या जगात करता येणार आहेत. इंटरनेटचा हा पुढील अद्ययावत अवतार माणसाला स्वतःमध्ये सामावून घेणारा असणार आहे.

तंत्रज्ञानाचे सुलभीकरण 

गेल्या दोन दशकांत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीने मानवी जीवन व्यापून टाकले आहे. इंटरनेटचा सुरुवातीचा वापर मर्यादित होता आणि आजचा विचार केला, तर आपल्यापैकी प्रत्येकजण स्वतःच्या खिशात इंटरनेट घेऊन फिरतो आहे. तंत्रज्ञानाचा वापर करण्यात जे सुलभीकरण झाले, त्याचा हा परिपाक आहे. शिक्षण, राजकारण, आरोग्य, खेळ, व्यवसाय, नोकरी या मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असणार्‍या प्रत्येक गोष्टीत इंटरनेटचा वापर केला जातो आहे. भारतही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील या महाकाय बदलाला अपवाद नाही. सुरुवातीला कॉम्प्युटर, इंटरनेट या गोष्टी स्वीकार करताना चाचपडणारा भारत साधारण 2010 च्या दशकाच्या शेवटी शेवटी हे तंत्रज्ञान आत्मसात करू लागला. गुगल, फेसबुक यांसारख्या तंत्रज्ञान कंपन्यांनी सुरू केलेल्या सेवा भारतात वापरल्या जाऊ लागल्या. 2ॠ, 3ॠ आणि आता 4ॠ वापरणारे भारतीय लोक झपाट्याने हे तंत्रज्ञान आत्मसात करत गेले. 2015 सालच्या दरम्यान भारतीय लोकांच्या हातात स्मार्टफोन आले. त्यानंतर इंटरनेट वापराच्या बाबतीत भारताने जगातील महाकाय देशांना मागे टाकले. एका आकडेवारीनुसार 2014 मध्ये भारतात अवघा 81 कोटी जीबी इंटरनेट डेटाचा वापर झाला होता. 2019 मध्ये तब्बल 5 हजार 491 कोटी जीबी एवढा इंटरनेट डेटा वापरला गेला. आजघडीला भारतात सुमारे 82 कोटी लोक इंटरनेट वापरत आहेत. फेसबुकच्या बाबतीतही भारतातली आकडेवारी पाहिली, तर फेसबुकची सेवा उपलब्ध असणार्‍या जगातील सर्व देशांच्या तुलनेत भारतात फेसबुकचे सर्वात जास्त वापरकर्ते आहेत. भारतात सुमारे 25 कोटी लोक फेसबुक वापरतात. असे असताना भारतीय लोकांच्या या तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या आणि वापरण्याच्या वृत्तीने जगभरातील महाकाय टेक कंपन्यांचे लक्ष वेधून घेतले. हाच इतिहास लक्षात घेऊन फेसबुकने आपल्या ‘मेटा’ या नवीन अद्ययावत सेवेसाठी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून भारताकडे मोर्चा वळवला आहे.

मेटामुळे भारतात मोठे बदल 

‘मेटा’च्या भारतातील अधिकार्‍यांनी या आठवड्यात एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये मेटाने भारताच्या बाबतीतले आपल्या कंपनीचे ध्येयधोरण स्पष्ट केले. ‘फ्युएल फॉर इंडिया’ या नावाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रिलायन्स जिओ आणि मेटा यांच्यात होऊ घातलेली भागीदारी आणि त्याअंतर्गत भारतीय बाजारपेठेत मेटाकडून केली जाणारी भविष्यकालीन गुंतवणूक पाहता, मेटा भारताकडे अत्यंत गांभीर्याने पाहते आहे हे स्पष्ट होते. या कार्यक्रमात बोलताना फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेचे कौतुक केले. मेटाच्या येऊ घातलेल्या एआर आणि व्हीआर तंत्रज्ञानाचा उपयोग भारतात शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक वाहतूक अशा पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदलून टाकणार आहे. मेटा जेव्हा प्रत्यक्षात भारतात काम करू लागेल तेव्हा भारतीय अभियंते, तंत्रज्ञ यांच्यासाठी उपलब्ध होणारा रोजगार ही यातील सर्वात मोठी फायद्याची गोष्ट ठरू शकते. 2006 साली भारतात फेसबुक सुरू झालं, तेव्हा हैदराबादमध्ये फक्‍त एका अ‍ॅपच्या माध्यमातून त्याची सुरुवात झाली होती. त्या वर्षाच्या अखेरीस भारतात सुमारे दीड कोटी लोक फेसबुक वापरत होते. आज भारतात फेसबुक वापरणारे तब्बल 40 कोटी लोक आहेत. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सुविधा पुरवताना मेटाला भारतीय अभियंत्यांची आणि तज्ज्ञांची गरज लागणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचे ज्ञान असणार्‍या युवकांना यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल.

छोट्या व्यावसायिकांना लाभ 

आज भारतातील स्टार्टअप्स, छोटे उद्योग, अगदी किराणा मालाचे दुकान चालवणारा व्यापारीही फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप बिझनेस इत्यादी सुविधांचा वापर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी करतो. वापरकर्त्यांची संख्याच इतकी अवाढव्य असल्यामुळे त्या त्या व्यवसायाची ग्राहकांची गरज या सुविधांच्या वापरामुळे भागवली जाते. व्हॉट्स अ‍ॅप बिझनेससारख्या सेवांमुळे तर छोट्या व्यावसायिकांना आपल्या व्यवहारात सुलभीकरण आणण्यासाठी मोठा फायदा झाला आहे. कोव्हिडच्या संकटात याचा अनुभव ग्राहक आणि व्यापारी या दोघांनीही घेतला आहे. तंत्रज्ञानाला सरावलेला भारतीय ग्राहक ही प्रत्येक व्यवसायाची जमेची बाजू आहे. मेटाच्या निमित्ताने येणारे नवीन तंत्रज्ञान आपल्या व्यवसायासाठी वापरून घेण्यास उत्सुक असणारे लोक भारतात मोठ्या प्रमाणावर आहेत. ही बाब लक्षात घेऊन नवनवीन व्यवसायांना आपला ऑनलाईन व्यवहार अधिकाधिक सुलभ करण्यासाठी अनेक पर्याय मेटामध्ये उपलब्ध करून दिले जातील. यामुळे व्यवसायांना त्यांची ऑनलाईन उपस्थिती वाढवण्यास मदत होईल. एआर आणि व्हीआरसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर जर दैनंदिन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात होऊ लागला, तर भारतीय बाजारपेठेसाठी ही मोठी क्रांती असेल.

शिक्षण क्षेत्रातही बदल 

शिक्षण क्षेत्रातही मेटाच्या वापरामुळे मोठा बदल घडून येईल. जगभरात गेली जवळजवळ दोन वर्षे कोरोनाच्या विषाणूने सर्व मानवी व्यवहारांवर प्रभाव टाकला. शाळा, महाविद्यालये बंद ठेवावी लागल्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू करावे लागले. ऑनलाईन शिक्षणाचा या काळात झालेला वापर पाहता, आता भारतीय शिक्षण व्यवस्था हा बदल स्वीकारण्यासाठी तयार झाली आहे. ‘मेटा’चे नवीन तंत्रज्ञान शिक्षणाच्या क्षेत्रात वापरले जाऊ लागेल तेव्हा आजच्यापेक्षाही प्रभावी पद्धतीने शिक्षण दिले जाऊ शकेल. आरोग्य शिक्षणाच्या बाबतीत तर एआर आणि व्हीआर तंत्रज्ञानाचा वापर क्रांती घडवून आणू शकतो. शस्त्रक्रिया करण्याचे शिक्षण घेताना त्यात प्रत्यक्ष मानवी शरीरावर शस्त्रक्रिया करून प्रात्यक्षिके पूर्ण करावी लागतात. एआर आणि व्हीआर तंत्रज्ञानाचा उपयोग करून या शस्त्रक्रिया व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीमधील आभासी मानवी शरीरावर या प्रात्यक्षिक शस्त्रक्रिया केल्या जातील.

एआर म्हणजेच ‘ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी’ हा मेटाव्हर्सच्या तंत्रातला महत्त्वाचा भाग आहे. सध्या ओप्पो या स्मार्टफोन बनवणार्‍या कंपनीने त्यांचा एक फोन बाजारात आणला. त्याच्या बरोबर ‘एअर ग्लास’ ग्राहकांना देण्यात आले. या चष्म्याचा वापर करून ओप्पो स्मार्टफोनच्या मदतीने एआर तंत्रज्ञान वापरायला लोकांनी सुरुवात केली आहे. जगप्रसिद्ध अ‍ॅपल कंपनीने आपल्या ‘मिक्स्ड रिअ‍ॅलिटी हेडसेट’ची घोषणा केल्यानंतर जगभरातील टेक कंपन्या आपले स्वतःचे ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी डिव्हाईस बनवण्यासाठी संशोधन करत आहेत. एकंदरच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक असणारे स्मार्ट डिव्हाईस येत्या काळात प्रचंड लोकप्रिय होण्याच्या दिशेने ही वाटचाल सुरू आहे. हा बदल जसा घडून येईल, तसे प्रत्यक्ष भौतिक जगाला समांतर असे एक नवीन आभासी विश्व तयार होईल आणि त्या विश्वात नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने लोक वावरत असतील. याचे नुकतेच घडलेले एक उदाहरण म्हणजे न्यूयॉर्कमधील एका जोडप्याने आपला विवाहच व्हर्च्युअल स्पेसमध्ये आयोजित केला होता. या विवाह सोहळ्याला व्हर्च्युअल डिव्हाईसचा वापर करूनच लोक उपस्थित राहिले. सध्या अशा विवाहाला कायदेशीर मान्यता अजून मिळालेली नाही. पण जसजसा या तंत्रज्ञानाचा वापर सार्वत्रिक होईल, तसा अशा अनेक छोट्या अडचणींवर तोडगा काढला जाईल.

गैरवापरावर नियंत्रण आवश्यक 

या सर्व सकारात्मक बाबींचा विचार करताना आणखी एका गोष्टीवर कटाक्षाने लक्ष ठेवावे लागेल. भारताच्या बाबतीत फेसबुक ज्या आव्हानाचा पूर्वीपासून सामना करत आला आहे, ती गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानाचा गैरवापर. फेक न्यूज, हेट स्पीच यांसारख्या गोष्टींवर सतत नजर ठेवून राहण्याची आणि त्या आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यासाठीची एक सक्षम यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. फेसबुककडे सध्या असलेली यंत्रणा मोठ्या प्रमाणावर काम करत असली तरी, ती अजूनही पूर्णपणे यशस्वी ठरलेली नाही. त्यात येऊ घातलेल्या मेटाव्हर्स तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने ही सर्व आव्हाने किती महत्त्वाची असतील, याचा अंदाज आजवर घडलेल्या प्रकारांतून येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर फेक न्यूज आणि हेट स्पीच या दोन्ही गोष्टी मेटा कशा पद्धतीने हाताळते यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून आहेत. आणखी एक आव्हान असे की, भारतात इंटरनेट वापरणार्‍या लोकांची संख्या मोठी असली तरी लोकसंख्येचा मोठा भाग हा वेगवान इंटरनेटपासून अजूनही वंचित आहे. इंटरनेट वापरकर्त्यांपैकी सुमारे 13 कोटी लोक आजही 2ॠ किंवा 3ॠ सेवाच वापरतात. एका बाजूला 5G इंटरनेटची चाहूल लागलेली असताना भारतात प्रत्येक व्यक्‍तीपर्यंत इंटरनेट सेवा पोहोचलेली नाही. ही दरी लक्षात घेऊन ‘मेटा’ला आपल्या भारतातील विस्ताराचा विचार करावा लागेल.

मेटाव्हर्सबद्दल बोलताना त्याचा उल्लेख ‘इंटरनेटचं पुढील व्हर्जन’ असा केला जातो. भारतात येत्या काळात लवकरच 5G इंटरनेट उपलब्ध होणार आहे. हायस्पीड इंटरनेट आणि मेटाव्हर्स तंत्रज्ञान या दोन गोष्टी हातात हात घालून काम करतील तेव्हाचं जग कसं असेल, याची कल्पना करणे फारसे अवघड नाही. नेटफ्लिक्ससारखे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मही व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीत पाहता येईल, असा कंटेंट उपलब्ध करून देतील आणि या सर्व बदलांमुळे माणसाचा ‘इंटरनेट एक्सपिरीयन्स’ कैक पटींनी अद्ययावत होईल. या आठवड्यात झालेल्या चर्चासत्रामध्ये मार्क झुकेरबर्ग यांनी भारतीयांच्या उद्यमशीलतेचं कौतुक केले. नवीन व्यवसाय, स्टार्टअप्स सुरू करण्याची, ते चालवण्याची भारतीयांची क्षमता आणि नावीन्यपूर्णता जगभरातील टेक कंपन्यांना भारताकडे आकर्षित करत आहे. साधारण दोन दशकांपूर्वी भारतात पाश्चिमात्य देशात जाऊन करिअर घडवण्याचा ट्रेंड आला होता. आता पाश्चिमात्य टेक कंपन्या आपली सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहत आहेत. हा अभूतपूर्व बदल मेटासारख्या बलाढ्य कंपनीने ओळखला नसता तर नवल! यानिमित्ताने भारतातील उद्योगांना, शिक्षणाला, आरोग्य सुविधांना आणि तंत्रज्ञानाला नव्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कार्यक्षमतेची नवी क्षितिजे गाठता येतील, अशी सकारात्मक आशा बाळगायला हरकत नाही.

– डॉ. योगेश प्र. जाधव

Back to top button