Latest

ENG vs SA : इंग्लंडचे सपशेल लोटांगण, दक्षिण आफ्रिकेचा २२९ धावांनी विजय

Shambhuraj Pachindre

मुंबई; वृत्तसंस्था : गतविजेत्या इंग्लंडचे दैन्य यंदाच्या विश्वचषकात संपण्याचे नाव घ्यायला तयार नाही. शनिवारी त्यांना येथील वानखेडे स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेकडून तब्बल 229 धावांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. त्यांची स्पर्धेतील ही तिसरी हार ठरली असून गुणतक्त्यात या संघाला थेट नवव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. (ENG vs SA)

स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडला न्यूझीलंडने दणका दिला. यातून सावरताना त्यांनी बांगला देशवर 137 धावांनी दणदणीत विजय मिळवून चांगले कमबॅक केले. मात्र, यानंतर नवख्या अफगाणिस्तानने गतविजेत्यांना 69 धावांनी नमवून समस्त क्रिकेट जगताला चकित केले. त्यानंतरही इंग्लंडची पराभवाची मालिका थांबलेली नाही. दक्षिण आफ्रिकेने त्यांच्यावर वर्मी घाव घातल्यामुळे इंग्लिश संघ गर्भगळीत झाला आहे. शनिवारच्या लढतीत पहिल्यांदा फलंदाजी करून दक्षिण आफ्रिकेने 7 गड्यांच्या मोबदल्यात 399 धावा कुटल्या. त्यांना इंग्लंडचे उत्तर होते 9 बाद 170.

इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यानंतर हेन्रिक क्लासेनने 67 चेंडूंत 107 धावा झोडताना डझनभर चौकार व चार षटकार खेचले. रॅसी व्हॅन दर दुसेन (60), रीझा हेंड्रिक्स (85) आणि मार्को जेन्सन (75) यांनी अर्धशतके झळकावली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने 399 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून रीस टॉपलीने तीन, गस अ‍ॅटिन्सन आणि आदिल रशीदने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

न लढताच इंग्लंड माघारी

चारशे धावांचे लक्ष्य समोर ठेवून मैदानात उतरलेल्या इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टो 10, जो रूट 3, डेव्हिड मलान 6, बेन स्टोक्स 5, जोस बटलर 15, हॅरी ब्रुक 17, आदिल रशिद 10 आणि डेव्हिड विली 12 धावांवर बाद झाले. गस अ‍ॅटकिन्सन (35) आणि मार्क वूड (43) यांनी 33 चेंडूंमध्ये 70 धावांची भागीदारी केली. ती अपयशी ठरली.

केशव महाराजने अ‍ॅटकिन्सनचा त्रिफळा उडवून इंग्लंडचा डाव 170 धावांवर संपविला. दक्षिण आफ्रिकेकडून जेराल्ड कोएत्झीने 3, लुंगी एन्गिडी, मार्को जान्सेन यांनी प्रत्येकी 2 तर कगिसो रबाडा व केशव महाराज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

इंग्लंडविरुद्ध विक्रमी धावसंख्या

या सामन्यात इंग्लंडविरुद्ध विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेने केला. पाकिस्तानने 2019 मध्ये इंग्लंडविरुद्ध 348 धावा केल्या होत्या. तो विक्रम आता मागे पडला आहे. वन डे क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध ही संघाची सर्वात मोठी धावसंख्या आहे. या बाबतीत दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला मागे टाकले. 2015 मध्ये ओव्हलवर न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध पाच बाद 398 धावा केल्या होत्या.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT