मनमाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
आमदार सुहास कांदे यांनी करंजवण पाणीपुरवठा योजनेला बाळासाहेबांचे नाव दिल्यामुळे मी त्यांचा ऋणी आहे. आम्ही एल्गार पुकारला तेव्हा सुहास कांदे माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते आणि ते माझा विश्वासू सहकारी आहे. त्यामुळे मनमाडबरोबरच नांदगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आणि मनमाडकरांना लवकरात लवकर पाणी मिळेल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. नगर परिषदेच्या नवीन इमारतीसाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याबरोबरच एमआयडीसी आणि ट्राॅमा केअर सेंटरचीही घोषणा त्यांनी केली.
शहरातील भगवान ऋषी वाल्मीकी स्टेडियमवर 311 कोटींच्या स्व. बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की. नागरिकांना जर पिण्यासाठी पाणी भेटत नसेल तर राज्यकर्त्यांचा उपयोग काय? मला आश्चर्य वाटते की एवढे वर्ष मनमाडकर पाण्यासाठी का थांबले ? आता तुम्ही सुहास कांदेंसारखा योग्य माणूस निवडला आहे. मी नगरविकासमंत्री असताना ही पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली. शिवाय नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती उत्तम नसल्याने नगर परिषदेचा हिस्सादेखील राज्य सरकार पूर्ण भरेल, अशी घोषणा त्यांनी केली. मागील अडीच वर्षांच्या काळात सर्व कामे बंद होती. राज्याचा सर्वांगीण विकास साधायचा आहे. त्यासाठी मी सर्व ठिकाणी पोहोचत आहे. मुख्यमंत्री म्हणून मी उभा असलो तरी एक कार्यकर्ता म्हणून माझे काम सुरू असून एमआयडीसी, ट्रॉमा केअर अशा मागण्या तुमच्या आमदाराने माझ्याकडे केल्या आहेत. या सर्व मागण्या पूर्ण होतील. येत्या महिन्यात एमआयडीसीसाठी भूसंपादनाचे काम सुरू होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी बोलताना आमदार सुहास कांदे म्हणाले की, या योजनेसाठी आपण माजी मुख्यमंत्र्यांकडे चकरा मारून उंबरठे झिजवले होते. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केल्याने मी वैतागून राजीनामा देण्याच्या मनस्थितीत होतो. मात्र, त्यावेळचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी माझी समजूत काढून त्यांनी क्षणात योजनेला मान्यता दिली. आज त्यांच्या हस्ते भूमिपूजनाने मला खूप आनंद आहे. साहेब मला तिकीट दिले नाही तरी चालेल, पण ही योजना पूर्ण करा. माझा बाप राजकारणी नव्हता पण मला ज्या जनतेने आमदार केले, त्यांना निधी कमी पडू देऊ नका. माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी तुमचा ऋणी राहील, असे भावुक उद्गार कांदे यांनी काढले.
याप्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील आणि स्थानिक नेत्यांची भाषणे झाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 300 दिव्यांग बांधवांना सायकल वाटप करण्यात आले. तसेच दोन फिरते दवाखाने आणि दोन फिरत्या कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह इतर काही पक्ष आणि संघटना, सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
स्टेडिअम हाउसफुल्ल
कार्यक्रमाला तुफान गर्दी लोटली होती. स्टेडियमवर अनेक मोठ्या नेत्यांची सभा झाली. मात्र, आजपर्यंत स्टेडियम कधीच भरले नव्हते. आज स्टेडियमबाहेर देखील गर्दी होती. कार्यक्रमाला सुमारे 40 हजारांपेक्षा अधिक समुदाय असूनही कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ झाला नाही.
हेही वाचा :