Green chillies : हिरवी मिरची आली कुठून? | पुढारी

Green chillies : हिरवी मिरची आली कुठून?

नवी दिल्ली : हिरवी मिरची पिकली की लाल होते. मिरचीचा केवळ तिखट स्वादासाठीच उपयोग होतो असे नाही तर तिच्यामध्ये काही औषधी गुणधर्मही असतात. हिरव्या मिरचीचा स्वाद अनेक प्रकारचा असू शकतो. अतिशय तिखट, कमी तिखट व अगदी फिक्या स्वादाच्याही हिरव्या मिरच्या असतात. काही मिरच्या आंबट, कडू व गोडसरही असतात. मिरचीतील कॅप्साइकन घटकावर तिचा स्वाद अवलंबून असतो. अशी ही हिरवी मिरची आली कुठून याबाबतही अनेकांना कुतुहल असते.

हिरवी मिरची ही ‘क’ जीवनसत्त्वाचा स्रोत आहे. तिच्या सेवनाने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. डोळे, त्वचा यासाठी ती गुणकारी असते तसेच तिच्या सेवनाने मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते. पोटातील कृमी, सूज, सांधेदुखी यावरही मिरचीचे सेवन लाभदायक ठरू शकते. हिरवी मिरची ही अँटी-ऑक्सिडंटचा चांगला स्रोतही असते. तिला ‘मूड बूस्टर’ही म्हटले जाते. अशीही बहुगुणी मिरची आली कुठून याबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते, मिरचीचे उत्पादन इसवी सनपूर्व 7 हजार वर्षांपूर्वी मेक्सिकोत सर्वप्रथम झाले.

ज्यावेळी इटालियन सागरी नाविक भारताचा शोध घेत असताना अमेरिकेत पोहोचले त्यावेळी मिरचीही अमेरिका खंडात पोहोचली असे काहींचे मत आहे. ज्यावेळी पोर्तुगीज भारतात आले त्यावेळी आपल्यासमवेत हिरवी मिरचीही घेऊन आले असे काहीजण म्हणतात. मात्र, पोर्तुगिज भारतात येण्याच्या पूर्वी भारतीय लोक मिरची खातच नव्हते का, असा सवालही अनेक संशोधक विचारतात. काही इतिहासकारांच्या मते, मिरचीचा जन्मच भारतात झाला आहे व त्याचे अनेक प्राचीन पुरावे उपलब्ध आहेत. भारतीय पाकशास्त्र आणि वैदिक ग्रंथांमध्ये मिरचीचा उल्लेख आढळतो. भारतीय पाककला आठ हजार वर्षांचा इतिहास सांगणारी आहे. त्यामध्ये अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांचा उल्लेख आहे. भारतात जगातील सर्वात तिखट मिरच्यांपैकी एक ‘भूत जोलकिया’ मिरची आढळते.

हेही वाचा…

Back to top button