Latest

नागपूर कारागृहातील गांजा प्रकरणी आठ जण अटकेत

स्वालिया न. शिकलगार

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात गांजा आणि मोबाईलच्या बॅटऱ्या पोहोचविणारी मोठी टोळी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. बुधवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने मध्यवर्ती तुरूंगात धाड टाकीत मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे. कारागृह परिसरात सुमारे दीडशे ते दोनशे पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाही असे बुधवारी पत्रपरिषदेत सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून आरोपींची संख्या वाढू शकते असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. बुधवारी घेण्यात आलेल्या झडतीत कारागृहातून सुमारे १५ मोबाईल बॅटरी जप्त करण्यात आल्या आहे.

या टोळीचा सूत्रधार अत्याचाराच्या आरोपात तुरूंगात शिक्षा भोगत असलेला पोलिस उपनिरीक्षक असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. याप्रकरणात मोक्का प्रकरणातील आरोपी सूरज कन्हैय्यालाल कावळे (वय २२, खापरखेडा) याच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली असून, कारागृहातील बंदीवान उपनिरीक्षकही पोलिसांच्या रडारवर आला आहे. अटकेतील आरोपींमध्ये सूरजचा भाऊ शूभम कावळे, त्याचा मित्र सूरज वाघमारे, अमली पदार्थ तस्कर मोरेश्वर सोनवणे, मुकेश बाबू पंजाबराव नायडू, भागीरथ थारदयाल व कुख्यात शेखू टोळीचा सदस्य अर्थव खटाखटी यांचा समावेश आहे.

कारागृहात गांजा व मोबाइल बॅटऱ्या पोहोचविण्याच्या टोळीचा सखोल तपास करण्यात येत आहे. याप्रकरणाचा तपास गुन्हेशाखा पोलिस व अमली पदार्थ विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे. गांजाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सोमवारी गुन्हेशाखा पोलिसांनी गांजा व मोबाईलच्या बॅटऱ्या कुठून घेण्यात आल्या याची माहिती गोळा केली. त्यानंतर मंगळवारी सहा जणांना अटक करण्यात आली. तर बुधवारी कारागृहात शोधमोहिम घेत झडती घेण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून मोक्का प्रकरणात सूरज व त्याचे साथीदार कारागृहात आहेत.

SCROLL FOR NEXT