नगर: लाचेची मागणी करणार्‍या लिपिकावर गुन्हा | पुढारी

नगर: लाचेची मागणी करणार्‍या लिपिकावर गुन्हा

शेवगाव तालुका, पुढारी वृत्तसेवा: शेत जमिनीवर चढविलेला बोजा कमी करणारे तहसीलदार यांचे पत्र तलाठी यांना देण्यासाठी महसूल सहायकाने 500 रुपये लाचेची मागणी केली. मात्र, ही रक्कम स्वीकारण्यापूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्याची चाहूल लागल्याने सदर लिपिक पळून गेल्याची घटना शेवगाव तहसील कार्यालयात घडली. महसूल सहायक मनोज रामचंद्र जाधव याच्या विरुद्ध लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक शरद गोर्डे यांच्या फिर्यादीवरुन शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांच्या जमिनीवर गौण खनिजसाठा मिळून आला होता. त्यामुळे तत्कालीन तहसीलदारांनी त्यांना 34 लाख 50 हजार 425 रुपयांचा दंड करून दंडाची रकम सातबारा उतार्‍यावर बोजा म्हणून नोंदविली होती.

तक्रारदाराने सदर कारवाई संदर्भात उपविभागीय अधिकारी पाथर्डी भाग यांच्याकडे अपिल केले होते. त्यामध्ये तहसीलदारांचा आदेश रद्द ठरविण्यात आलेला आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाच्या अनुषंगाने सातबारावरील बोजा कमी करण्याचे तहसीलदारांचे पत्र संबंधित तलाठ्यास देण्यासाठी लिपिक जाधव याने तक्रारदाराकडे 500 रुपये लाचेची मागणी केली होती. प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीवरुन दि.24 ऑगस्ट रोजी पंचासमक्ष लाचेची मागणीची पडताळणी केली असता, त्यानेे तक्रारदाराकडे 500 रुपयांची मागणी करुन सदर लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, कारवाईची चाहूल लागताच तो पळून गेला.

Back to top button