Latest

Eco Friendly Ganpati : गणेशाला वंदन, पर्यावरणाचे रक्षण..! जाणून घ्‍या इको-फ्रेंडली मूर्तीकारांविषयी

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : आतुरतेने वाट पाहणारा सण म्हणजे आपल्या बाप्पाचा सण अर्थात गणेशोत्सव. लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वांची धावपळ आपल्या बाप्पाच्या स्वागताच्या तयारीसाठी. या मंगल उत्‍सवात आपल्‍याला वेगवेगळ्या स्वरुपात गणपती मूर्ती पाहायला मिळतात. गणराय म्‍हणजे 'निसर्ग' आणि श्रद्धेचा एक अनोखा बंध आहे. दोन-चार दगड घेऊन योग्‍यरित्‍या मांडले तरी गणपतीच्या आकाराचा भास आपल्‍याला होतो. इतकं विघ्नहर्त्याचे निसर्गातील विविध आकारांशी एकत्‍व आहे. अलिकडे गणेशभक्त आपला गणराया इको फ्रेंडली असावा याला अधिक महत्त्व देतात. त्याचबरोबर गणेश उत्‍सव पर्यावरपूरक हाेण्‍यासाठी वेगवेगळ्या कल्पना तयार होत आहेत. यातील काही इको-फ्रेंडली मूर्तीकारांविषयी जाणून घ्‍या. (Eco Friendly Ganpati )

 संबधित बातम्या

कोल्हापूर : 'चेतना'चे गणपती गेले दुबईला (Eco Friendly Ganpati)

कोल्हापुरमधील चेतना अपंगमती विकास संस्‍थेच्‍या विद्यार्थ्यांनी यंदाही इको-फ्रेंडली मूर्ती बनवत गणेशोत्सव चेतनामय केला आहे. चेतना व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात 'विशेष मुले' दरवर्षी पर्यावरणपूरक गणपती करत असतात. यंदाही या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणपती तयार करत यंदाचा गणेशोत्सव चेतनामय करण्याचं ठरवलं. त्यांनी कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या इको फ्रेंडली गणेश मूर्ती यंदा दुबईला गेल्या आहेत. चेतना कार्यशाळेतील विशेष मुलांनी तयार केलेल्या या गणेश मूर्तींना शहरात, इतर जिल्हे, राज्ये व परदेशातही मोठी मागणी आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, पुणे, सांगलीसह अनेक जिल्ह्यात चेतनाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या गणरायाच्या इको-फ्रेंडली मूर्तींपासून विविध वस्तुंची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

यंदा  कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ  संतोष पाटील,  दीपक घाटे (समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद. कोल्हापूर) शिवाय जिल्हा परिषद कोल्हापूर, करवीर व हातकणंगले पंचायत समिती या ठिकाणी सुद्धा चेतना कार्यशाळेतील मुलांनी तयार केलेल्या इको फ्रेंडली गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे.

कोल्हापुरमधील चेतना अपंगमती विकास संस्थेमधुन यावर्षी कार्यशाळेत २५० मूर्त्या बनविल्या असून अगदी ९ | इंचापासून ३ फूटांपर्यंत मूर्त्या.

दरवर्षी कोल्हापूर शहराबरोबर पुणे, मुंबई, सांगली व कर्नाटक राज्यातून चेतनाने केलेल्या मूर्तींना ऑर्डर्स येतात. यावर्षी कार्यशाळेत २५० मूर्ती बनविल्या असून अगदी ९ इंचापासून ३ फूटांपर्यंत मूर्ती साकारल्‍या आहेत.

कोल्हापुरमधील चेतना अपंगमती विकास संस्थेचे विद्यार्थी गणपती बनवताना.

संस्थेचे अध्यक्ष नरेश बगरे, कार्यकारी अध्यक्ष पवन खेबुडकर, कार्यशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक कृष्णात चौगले, शिक्षक कृष्णात कुंभार, अमित सुतार, यांच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज सुरू आहे.

कर्नाटक : शाडूपासून गणेश मूर्ती, कोण्णूर गावातील ६० कुटुंबांकडून ३ लाख मूर्ती

कर्नाटकातील गोकाक तालुक्यातील कोण्णूर गावाने आपली एक स्वतंत्र ओळख बनवली आहे. ही ओळख निर्माण झाली आहे ती, शाडूपासून मूर्ती बनवण्याच्या कामामुळे. या गावात तब्बल ६० कुटुंबे  सुमारे ३ लाख शाडूच्या गणेशमूर्ती बनवतात. त्यामुळे, पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविणारे हे गाव चर्चेत आले आहे. वर्षभर शाडूपासून मूर्ती बनवण्याचे काम सुरु असते.

गणेश मूर्ती निर्मितीमध्ये पेण गावाचे नाव घेतले जाते; पण, गेल्या काही वर्षापासून कर्नाटकातील गोकाक तालुक्यातील कोण्णूर गावानेही आपली वेगळी ओळख बनवली आहे. या गावातील ६० कुटुंबे तीन लाख शाडूच्या गणेशमूर्ती बनवतात. त्यामुळे, पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविणारे हे गाव चर्चेत आले आहे. या गावातील मूर्तीकार मूर्ती बनवण्यासाठी हिडकल (राजा लखमगौडा) जलाशय परिसरात असलेल्या गावातील माती आणि शाडूचा वापर करण्यात येतो. किमान तीस फूट खोदाई केल्यानंतर मूर्तीसाठी लागणारा शाडू मिळतो.

कोण्णूर गावात ६० कुटुंबांकडून तब्बल ३ लाख मुर्ती

रायगड: 'टेराकोटा' मातीपासून गणराया आणि मुलींच्या शिक्षणासाठी हातभारी

पनवेल तालुक्यातील (जि.रायगड) शाश्वत ग्रामीण विकासाचे प्रयोग करणाऱ्या युसुफ मेहरअली सेंटरमध्ये २०१४ पासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवल्या जातात. पर्यावरण संवर्धनासह ग्रामीण आणि आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबवला जातो, तसेच या गणेश मूर्ती विक्रीतून तारा येथील आदिवासी वस्तीगृहातील १४० मुलींच्या शिक्षणासाठी हातभार लागतो. ही विशेष बाब आहे.

या मूर्ती परिसरातील शेतातील मातीसह टेराकोटा नावाच्या लाल मातीपासून बनवल्‍या जातात. ही माती  शाडू मातीपेक्षा लवकर विरघळते  यामुळे जल प्रदूषण होत नाही. या मूर्तीचे वैशिष्ट्ये म्हणजे टेराकोटा या गणेश मूर्तीमध्ये वेगवेगळ्या झाडांचे बी असून त्या गणेश मूर्तीचे विसर्जन घरातच करता येते. या नंतर या मातीचा उपयोग घरातील कुंडीतील झाडांना होतो. तसेच बी कुंडीत लावून त्यापासून झाड तयार होते. त्यामुळे निसर्ग संवर्धन करण्यास मदत मिळते. ताराचे संतोष ठाकूर सांगतात पनवेल, खांदेश्वर, कामोठे, कळंबोली, खारघर, बेलापूर इत्यादी ठिकाणाहून अनेक ग्राहक या टेराकोटा मातीच्या गणेश मूर्तीची मागणी मोठ्या प्रमाणात करतात.

शाडू पासुन गणेश मूर्ती कोण्णूर गाव ; ६० कुटुंबांकडून ३ लाख मुर्ती

नाशिक : मातीचे उत्खनन टाळूया, पुनर्वापर करूया (Eco Friendly Ganpati)

नाशिक जिल्ह्यातील सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमी गणेशभक्तांनी अनोखा निर्णय घेतला आहे. शाडू माती ही मर्यादित संसाधन आहे. त्यासाठी त्याचे उत्खनन न करता त्याचा पुनर्वापर करूया. ही संकल्पना समोर ठेवून यंदा शाडू माती रक्षकांनी असा उपक्रम अनंत चतुदर्शीच्या दिवशी शहरात राबवणार आहेत.

शाडू मातीची गणेशमूर्ती विसर्जित केल्यानंतर, विरघळलेली माती मूर्तिकारांना देऊन पुढील वर्षी त्याच मातीची मूर्ती घडविण्यासाठी मूर्तिकारांना देण्यात येणार आहे. शाडू मातीचा पुनर्वापर करायचा अशी पर्यावरणपूरक संकल्पना आहे. पुण्यातील इकोएक्झिट या संस्थेची ही संकल्पना असून, ती यंदा शहरात राबविण्यात येणार आहे. निसर्गयान, ग्रंथ तुमच्या दारी, नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, इस्पॅलियर स्कूल, डे केअर, पुणे विद्यार्थीगृह, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, वैराज कलादालन, धन्वंतरी कॉलेज यांसारख्या अनेक संस्था उपक्रमात सहभाग घेणार आहेत.

मुंबई : ट्री गणेशा संकल्पक दत्ताद्री कोथूर (Eco Friendly Ganpati)

मुंबई वरळीचा असलेला दत्ताद्री कोथूर हा 'ट्री गणेशा संकल्पक' म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने २०१५ पासून अशा पर्यावरणपूरक गणपती मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली. या मूर्तींना प्रचंड मागणी आहे. मुंबईसह सुरत, बंगळूर आणि अगदी दुबई आणि अमेरिकेतूनही मागणी आहे. ही मूर्ती विसर्जितच करावी लागत नाही. कारण ही मूर्ती लाल माती आणि बियाण्यांसह सेंद्रिय खतापासून बनवली आहे. विसर्जना दिवशी फक्त त्यावर पाणी घालायचं त्यानंतर हळूहळू गणपती मूर्तीचे मातीत रुपांतर हाेते.

मुंबई वरळीचा असलेला दत्ताद्री कोथूर ट्री गणेशा संकल्पक प्रसिद्ध आहे. (Eco Friendly Ganpati)

मुंबई : गणपती बाप्पाच घेऊन जाणार माशांसाठी 'प्रसाद'

'स्प्राउट्स एन्व्हायर्नमेंट ट्रस्ट'चे (SPROUTS Environment Trust) संस्थापक अध्यक्ष मुंबई स्थित असलेले आनंद पेंढारकर यांनी गणरायाच्या हटके मूर्ती तयार केल्या आहेत. त्यांनी या मूर्ती तयार करत असताना त्यांना रंग नैसर्गिक दिले आहेत. उदा : हळदीचा रंग. त्याचबरोबर मूर्ती तयार झाल्यानंतर मूर्तीचा पोटाचा पोकळ भाग आहे त्यामध्ये मका, पालक, पीठ यांचे गोळे केलेले खाद्यपदार्थ घातले जातात. जेणेकरुन समुद्रातील माश्यांसह इतर जीवांना खाद्यान्न मिळेल. विसर्जनानंतर शाडूची माती पाण्यात विरघळल्यानंतर हे खाद्य माशांना मिळते.

गणपती बाप्पाच घेवून जाणार माशांसाठी 'प्रसाद' Eco Friendly Ganpati

या उपक्रमात शाडूच्या मातीपासून साधारणत: नऊ इंच उंचीचा गणपती तयार केला जातो; पण हा गणपती तयार झाल्यानंतर मूर्तीच्या पोटामध्ये माशांसाठी शाकाहारी खाद्याचे गोळे भरले जातात. शाडूची माती पाण्यात विरघळल्यानंतर हे खाद्य माशांना मिळते. त्यामुळे केवळ समुद्रातीलच नव्हे, तर अन्य जलाशयांतील माशांचे जीवन वाचू शकते. हे खाद्यपदार्थ म्हणजे मका, पालक पीठ यांचा गोळा असतो.

पुणे : 'झिरो बजेट' बाप्पा; टाकाऊ वस्तूंपासून विद्यार्थ्यांनी बनवले 'चांद्रयान' 

पुण्यातील विद्यार्थी साहाय्यक समिती मधील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा गणेशोत्सव 'झीरो बजेट' असतो. परिसरातील टाकाऊ वस्तू यासाठी उपयोगात आणल्या जातात. मुलांच्या लजपतराय विद्यार्थी वसतिगृहात, मुलींच्या आपटे वसतिगृहात तसेच सुमित्रासदन वसतिगृहात हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो.

या तिन्ही वसतिगृहातील गणेशोत्सवात यंदा भारताची चंद्रयान -३ अवकाशातील यशस्वी मोहीम आकर्षक देखाव्यातून मांडण्यात आली आहे. कागदाच्या पुठ्ठ्यापासून तसेच वसतिगृह परिसर कुंड्यातील मातीपासून बनवलेली गणेशाची सुबक मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सजावटीच्या आजूबाजूला भारताच्या यशस्वी अवकाश मोहिमेत योगदान दिलेल्या शास्त्रज्ञाचे फोटो लावण्यात आले आहेत.

निर्माल्यापासून खत निर्मिती 

अनेक सण – उत्सव पर्यावरण पूरक पध्दतीने साजरे करण्यासाठी शासनाबरोबर अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. प्रथा – परंपरा आणि उत्सव पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे करणे ही काळाची गरजही आहे. त्याचे एक आदर्श उदाहरण म्हणजे, ठाण्यातील समर्थ भारत व्यासपीठ संस्था. या संस्थेच्या वतीने गेल्या 1 तपापासून शहरात निर्माल्यातून खतनिर्मितीचा उपक्रम राबवत आहे. या संस्थेच्या प्रयत्नांना ठाणे महापालिकेच्या पाठबळ लाभले, त्यामुळे गेल्या 12 वर्षापासून गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, महाशिवरात्र, गजानन महाराज प्रकट दिन आणि दसरा या सण तसेच धार्मिक उत्सवाच्या काळात शहरात घराघरात, देवळातून बाहेर पडणार्या निर्माल्याचे संकलन संस्थेच्या वतीने केले जाते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT