Konkan Ganeshotsav : गणेशोत्सव आणि कोकणी माणसांचा स्नेहमेळा….! | पुढारी

Konkan Ganeshotsav : गणेशोत्सव आणि कोकणी माणसांचा स्नेहमेळा....!

अजित सावंत

रत्नागिरी :  गणेशोत्सव हा जगभरात साजरा होत असला तरी कोकणच्या गणेशोत्सवाचे वेगळेपण सर्वांनाच भावते. कोकणी माणूस जगात कुठेही असला तरी तो गणपतीसाठी गावी येतोच. वर्षभर त्याला या उत्सवाची आतुरता लागून राहिलेली असते. कुटुंब कबिल्यासह तो आपल्या गावी पोहोचतो आणि सारे घर उत्साहाने भरून जाते. एरवी कामधंद्याच्या व्यापात एकमेकांना न भेटणारे गणेशोत्सवात मात्र गावी सर्वांना आवर्जुन भेटतात. गावातील स्थानिक मंडळी आणि चाकरमानी अशा कोकणी माणसांचा या उत्सवात एक स्नेहमेळा भरतो.(Konkan Ganeshotsav)

एकमेकांची आपुलकीने विचारपूस करत एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात. कोकणातील गणेशोत्सव संपूर्ण कुटुंबाला जोडणारा, रक्ताची नाती जवळ आणणारा आणि आनंदाचे वातावरण निर्माण करणारा असतो. कालौघात जग कितीही बदलले असले तरी आजही गावागावात या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र कुटुंब पद्धत जपली जात आहे, हेही या उत्सवाचे वैशिष्टय आहे. कोकणात शिमगा आणि गणेशोत्सव हे दोन सण व्यापक स्वरुपात साजरे केले जातात. श्रावण महिना सुरू झाला की चाहूल लागते ती ‘चवथी’च्या सणाची.

नागपंचमी, नारळी पौर्णिमा आणि गोकुळाष्टमी झाली की गणेश चतुर्थी अगदी जवळ आल्यासारखी वाटते. मग कोकणी माणसाची लगबग सुरू होते. घराघरांची साफसफाई, रंगरंगोटी या कामांना वेग येतो. तर मुंबईत नोकरी धंद्यानिमित्त असलेला कोकणी माणूस गावी येण्यासाठी व्याकूळ होतो. गावाकडे संपर्क साधून चतुर्थीच्या तयारीचा अंदाज घेतला जातो. पूर्वी चाकरमान्यांचा भार एसटी महामंडळावरच होता मात्र गेल्या २०-२५ वर्षात कोकण रेल्वे सुरू झाली आणि एसटीवरचा भार हलका झाला. कोकण रेल्वे गणपतीसाठी शेकडो जादा गाड्या सोडते पण गावी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या एवढी असते की त्या गाड्याही अपुऱ्या पडतात. त्यामुळे अनेकजण ‘गड्या आपली एसटी बरी’ असे म्हणत एसटीचे बुकिंग करतात. आजही अनेक चाकरमान्यांची पसंती एसटी बसेसनाच असते. सुमारे दोन हजारहून अधिक एसटी बसेस कोकणात चाकरमान्यांना घेवून येतात.

पूर्वीच्या काळी नोकरी, व्यवसायातील मुंबईकर ग्रामविकास मंडळामार्फत एसटी गाड्या बुकिंग करून गावी येत असत. आपला मुलगा, वडील, भाऊ गावी येणार म्हणून रात्री- अपरात्री कंदिल घेवून त्यांची एसटी थांब्यावर वाट पाहिली जात असे. एवढी प्रतीक्षा आणि आत्मियता त्यावेळी होती. अर्थात गेल्या काही वर्षात शहरीकरणाचा परिणाम कोकणातील घरांवर आणि माणसांवर दिसू लागला असला तरी मुंबईकरांची चतुर्थीला गावी येण्याची आणि मुंबईकर गावी कधी येतात याची स्थानिकांची ओढ कमी झालेली नाही. आता स्वतःच्या चारचाकी गाड्यांनीही चाकरमानी गावी येवू लागले आहेत. अनेक चाकरमानी दोनचार दिवस आधीच गावी पोहोचतात. पूर्वी
कोकणचे अर्थकारण चाकरमान्यांच्या मनीऑर्डरवरच अवलंबून होते मात्र जसजसा काळ बदलला तसतसा कोकणी माणूस आता आर्थिकदृष्ट्या हळूहळू सक्षम होवू लागला आहे. अर्थात गावची स्थानिक मंडळी आणि मुंबईकर असे दोन्ही एकत्रितपणे खर्चाची जबाबदारी उचलून मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. (Konkan Ganeshotsav)

कोकणात घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना केली जात असली तरी आजही गावागावात वर्सल पद्धत आहे. वर्सल म्हणजे एका घरात चार कुटुंबे असली तर दरवर्षी एकाने असा त्या वर्षीचा चतुर्थीचा खर्च करायचा मात्र चारही कुटुंबातून गणरायाला नेवैद्य अर्पण करायचा अशी पद्धत आहे. काही ठिकाणी कुटुंबे अनेक असली तरी त्या घरात एकत्रितपणे उत्सव साजरा केला जातो. जो काही खर्च होतो तो सर्व एकत्रितपणे करतात. जिल्हयात काही ठिकाणी ४२ कटुंबातील तर काही ठिकाणी ८० कुटुंबातील माणसे एकत्र येवून गणेशोत्सव साजरा करतात. एरवी विभक्त असलेले गणेश चतुर्थीच्या अकरा दिवसात एकत्रितपणे जेवण करतात, बाप्पांच्या उत्सवात भक्तीभावाने सहभागी होतात, एकमेकांची सुखदुःखे जाणून घेतात. यानिमित्ताने रक्ताची नाती जवळ येतात, कौटुंबिक जिव्हाळा वाढतो.

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर पूजा अर्चा, नेवैद्य, आरती, भजने, फुगड्या यामध्ये गणेशोत्सवाचे दिवस कधीच निघून जातात ते समजत नाही. मात्र या उत्सवाच्या निमित्ताने नोकरी धंद्यासाठी दुरवर गेलेली माणसे एकत्र येवून विचारमंथन करतात. एकमेकांच्या सहवासात सुखदुःख वाटून घेतात. वर्षभराची ऊर्जा त्यांना यातून मिळते. परस्परांमधला स्नेहभाव, आपलेपणा वाढतो हे या उत्सवाचे वैशिष्टय आहे म्हणूनच कोकणी माणसासाठी गणपतीचा उत्सव खऱ्या अर्थाने आगळावेगळा असतो. (Konkan Ganeshotsav)

Back to top button