Latest

Diwali Muhurat Trading 2023 | काय आहे दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग?, जाणून घ्या वेळ, महत्त्व आणि इतिहास

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : दिवाळीतील मुहूर्ताच्या ट्रेडिंगसाठी शेअर बाजार उद्या १२ नोव्हेंबर रोजी काही वेळासाठी खुला राहणार आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माहितीनुसार, मुहूर्त ट्रेडिंग सत्र संध्याकाळी ६ ते ७.१५ दरम्यान होईल. (Diwali Muhurat Trading 2023)

संबंधित बातम्या 

मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय?

मुहूर्त ट्रेडिंग ही देशातील एक विशेष आणि शुभ परंपरा मानली जाते. दिवाळी दिवशी मुहूर्त ट्रेडिंगसाठी मुंबई स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) एक तासांसाठी खुला ठेवला जातो. याला मुहूर्त ट्रेडिंग (Muhurat Trading) असे म्हणतात. (Diwali Muhurat Trading 2023) नवीन आर्थिक वर्षाची सकारात्मक सुरुवात म्हणून मुहूर्त ट्रेडिंगकडे पाहिले जाते आणि भारतीय शेअर बाजारातील ही एक महत्त्वाची परंपरा आहे.

मुहूर्त ट्रेडिंग २०२३ ची तारीख आणि वेळ

१२ नोव्हेंबर रोजी एक तासाचे विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र होणार आहे. हे सत्र १५ मिनिटांच्या प्री-मार्केट सेगमेंटसह संध्याकाळी ६ ते ७.१५ पर्यंत होईल. इक्विटी, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज, इक्विटी फ्यूचर्स आणि ऑप्शन्स, सिक्युरिटीज लेंडिंग अँड बोरोइंग (SLB) यासह विविध विभाग या वेळेत खुले राहणार आहेत.

मुहूर्ताच्या ट्रेडिंगचे महत्त्व काय?

दिवाळीचा पहिला दिवस हा हिंदू धर्मशास्त्रात लेखा वर्ष, सवंत म्हणून ओळखला जातो. असे मानले जाते की या दिवशीचा मुहूर्त वर्षभर संपत्ती आणि समृद्धी आणतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजार एक तासासाठी खुला ठेवला जातो. कारण हे संवत २०७९ सुरु होण्याचे प्रतिक आहे. ज्याचा अर्थ हिंदू धर्मशास्त्रात लेखा वर्ष असा आहे. या दिवशी व्यापारी वर्ग वहीपूजन करतात. दिवाळीत या मुहूर्तावर केले जाणारे पूजन शुभ मानले जाते. रविवारी शेअर बाजार नियमित वेळी बंद असतो. पण रविवारी १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी केवळ एक तासासाठी तो खुला राहणार आहे.

काय आहे मुहूर्त ट्रेडिंगचा इतिहास?

मुहूर्त ट्रेडिंगच्या गेल्या १० पैकी ७ विशेष सत्रांमध्ये बीएसई सेन्सेक्स उच्च पातळीवर बंद झाला होता. गेल्या दोन मुहूर्त ट्रेडिंगमध्ये शेअर बाजाराने तेजीत व्यवहार केला होता. २०२२ मधील मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही प्रत्येकी ०.८८ टक्के वाढले होते, तर २०२१ मध्ये दोन्ही निर्देशांक प्रत्येकी ०.४९ टक्क्यांनी वाढले होते. दिवाळीत बीएसईवर मुहूर्ताचे ट्रेडिंग १९५७ मध्ये सुरू झाले होते. तर एनएसईवर १९९२ मध्ये याची सुरुवात करण्यात आली होती. (Diwali Muhurat Trading 2023)

गुंतवणूकदारांनी काय करावे?

या दिवशी शेअर बाजारातील गुंतवणूकदार लाँगटर्म हिशोबाने चांगल्या कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी करतात. तसेच काही शेअर्सच्या गुंतवणुकीमध्ये नफा असल्यास ट्रेडिंगच्या दरम्यान नफ्यातील काही भागाची विक्री करतात आणि लक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरूपात नफा घरी आणतात. जर तुम्ही मुहूर्त ट्रेडिंग सत्रात शेअर्स खरेदी करणार असाल तर त्या अशा कंपन्यांच्या शेअर्सचा विचार करा ज्यांची स्थिती मुळात मजबूत आहे. तसेच अशा कंपन्यांचा विचार करा ज्या दीर्घ मुदतीत चांगला व्यवसाय करतील.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT