Latest

वऱ्हाडी वाजंत्री : आनंदाला लागलाय मोबाईलचा नाद!

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील जिव्हाळ्याचा विषय आहे. लग्नात घडलेल्या गंमतीजंमती आणि 'वऱ्हाडी वाजंत्री'ची धम्माल-मस्ती अखेरपर्यंत प्रत्येकाच्या मनाच्या कोनाड्यात रुंजी घालत असतात. हिच धमाल-मस्ती आता प्रेक्षकांना 'वऱ्हाडी वाजंत्री' या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे.

अभिनेते-दिग्दर्शक विजय पाटकर यांनी दिग्दर्शित केलेला 'वऱ्हाडी वाजंत्री' हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 'स्वराज फिल्म प्रॉडक्शन' या बॅनरखाली निर्माते कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्यासह अतुल राजारामशेठ ओहळ यांनी या चित्रपट बनवला आहे. यामध्ये विनोदवीर आनंदा कारेकर एका वेगळ्याच रंगात रंगलेला दिसणार आहे. यामुळे 'वऱ्हाडी वाजंत्री' या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

चित्रपटांपासून नाटक आणि मालिकांपर्यंत सर्वच ठिकाणी आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या आनंदानं मल्टीस्टारर 'वऱ्हाडी वाजंत्री' मध्येही आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. याबाबत आनंदा म्हणाला की, 'वऱ्हाडी वाजंत्री' या चित्रपटात मी एक 'कलंदर' व्यक्तिरेखा साकारली आहे. यातील सर्वच कॅरेक्टर्स एका पेक्षा एक अतरंगी आहेत, पण मी साकारलेलं 'चमन' हे कॅरेक्टर या सर्वांपेक्षा वेगळं आहे. कारण याला मोबाईलचा भारी नाद आहे. आज प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे, पण काहीजण त्याचा अतिवापर करतात किंवा त्याचं प्रदर्शन मांडतात. अशांपैकीच हा आहे. कपडे रंगीबेरंगी असल्यानं मी सर्वांमध्ये अधिक उठून दिसतो.

दैनंदिन जीवनात वावरताना लग्नात नेहमीच असं एखादं कॅरेक्टर दिसतं, ज्याच्या कानाला कायम मोबाईल चिकटकलेला असतो. हे लोक नेमकं काय करतात हे आजूबाजूच्या कोणालाच माहित नसतं. तसंच काहीसं याच्या बाबतीत आहे. याचा फोन आला की, यानं कोणाला फोन केलाय हे समोरच्याला काही कळत नाही, पण हा सतत बोलत असतो. नेमकं काय गौडबंगाल आहे ते सिनेमात समजेल. 'वऱ्हाडी वाजंत्री'मध्ये दिग्दर्शक विजय पाटकर सरांनी माझ्यासह २१ हून अधिक हरहुन्नरी विनोदवीरांची फौज घेवून येत असल्याने खुमासदार रंगत येणारचं.'

या चित्रपटात विनोदाचा बादशा मकरंद अनासपुरेसोबत पंढरीनाथ कांबळे, हेमांगी कवी, मोहन जोशी, रिमा लागू, विजय कदम, प्रिया बेर्डे, जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, प्रभाकर मोरे, पूर्णिमा अहिरे, सुनील गोडबोले, प्रशांत तपस्वी, राजेश चिटणीस, विनीत बोंडे, गणेश रेवडेकर, जयवंत भालेकर, शिवाजी रेडकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहापुरे, साक्षी परांजपे आदी कलाकार आहेत.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT