पिंपळनेर, जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यातील पेसा क्षेत्रातील 18 ग्रुप ग्राम पंचायतींचे विभाजन करुन नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात आलेली आहे. या नवीन ग्रामपंचायतींच्या इमारतीच्या बांधकामासाठी प्रत्येकी 20 लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार मंजुळा गावित यांनी दिली आहे.
साक्री तालुक्यात राष्ट्रीय ग्रामस्वराज अंतर्गत 3 कोटी 60 लाखांच्या निधीतून 18 ग्रामपंचायतींचे नवीन कार्यालय होणार आहे. त्यात प्रामुख्याने पेसा क्षेत्रातील जयरामनगर, पुनाजीनगर, शिवाजीनगर, होळ्याचा पाडा, म्हाळ्याचापाडा, हारपाडा, सांडेल, चिंचपाडा, बोढरीपाडा, मल्याचापाडा, कुडाशी, महुबंद, पाचमौली (बुरुडखे)शिवा, देगाव, चावडीपाडा, काकरपाडा, राईनपाडा, हनुमंतपाडा या गावांचा समावेश आहे. सध्या मात्र येथील ग्रामपंचायतींचे कामकाज खाजगी जागेत सुरु आहे. परंतु, आता अद्ययावत ग्रामपंचायतींचे कार्यालय मंजुर झालेले असल्याने त्यात प्रामुख्याने सरपंच, उपसरंपच, ग्रामसेवक यांचे स्वतंत्र कार्यालय ग्रामपंचायतींच्या सभांसाठी प्रशस्त सभागृह, संगणक कक्ष इ. बाबींचा समावेश असणार आहे.