नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील उद्योजकांच्या सुरक्षिततेचे सर्व आवश्यक अशा उपाययोजना केल्या जातील आणि औद्योगिक वसाहत परिसरात जास्तीत जास्त गस्त वाढवली जाईल, असे आश्वासन नाशिक ग्रामीणचे नूतन पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिले. अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) आणि नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांची भेटीप्रसंगी देशमाने बोलत होते.
निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे आणि आयमाचे अध्यक्ष ललित बूब यांनी उद्योजकांच्या विविध विषयांवर देशमाने यांच्याशी सविस्तर चर्चा करून उद्योजकांबाबत असणाऱ्या मागण्यांचे निवेदन दिले. उद्योजक हा देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत परिसरात कायम शांतता नांदावी यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येईल. तसेच उद्योजकांनी आवश्यक ते सर्व सहकार्य करावे, असेही देशमाने म्हणाले. पोलिस आणि उद्योजक यांची समन्वय समिती नेमावी. समितीच्या सातत्याने बैठका घेऊन उद्योजकांच्या विविध समस्यांचे निराकरण तातडीने व्हावे, असे शिष्टमंडळाने बैठकीच्यावेळी निदर्शनास आणले असता देशमाने यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.
शिष्टमंडळात निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे आणि आयमाचे अध्यक्ष ललित बूब, निमाचे सचिव राजेंद्र अहिरे, आयमाचे उपाध्यक्ष उमेश कोठावदे, सरचिटणीस प्रमोद वाघ, सचिव हर्षद बेळे, योगिता आहेर, निमाचे कार्यकारिणी सदस्य रवी शामदसानी, मनिष रावळ आदींचाही समावेश होता.