नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारताच्या अर्थव्यवस्थेत एमएसएमई उद्योग अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. कोविड-19 महामारीनंतर २०२१-२२ दरम्यान देशाच्या ढोबळ मूल्यवृद्धीत (जीव्हीए) लक्षणीय वाढीसाठी एमएसएमई उद्योगांनी भरीव योगदान दिले असल्याचे दिसून आले आहे. या क्षेत्राने रोजगारात 1.6 पट अधिक संधी निर्माण केल्या आहेत. (MSME – Ministry of Micro, Small and Medium Enterprises)
यू ग्रो कॅपिटल-डन अँड ब्रॅडस्ट्रीट या वित्तीय विश्लेषक संस्थांनी सादर केलेल्या 'एमएसएमई संपर्क बाय-ॲन्युअल रिपोर्ट ऑन द लेटेस्ट इन एमएसएमई लेंडिंग इकोसिस्टीम' अहवालात कोविडनंतर भारतीय एमएसएमई उद्योगांची सद्यस्थिती, पत परिस्थिती, पतनिर्मिती आणि कर्जाच्या वाढत्या आकाराबाबत प्रकाशझोत टाकला आहे. अहवालात देशांतर्गत मागणी, नफा, वाढता भांडवली खर्च आणि नियुक्तीबद्दलचे चित्र अतिशय सकारात्मक मांडण्यात आलेले आहे. एमएसएमई क्षेत्राची लवचिकता, नवकल्पना आणि आर्थिक वाढ त्याचप्रमाणे रोजगाराला चालना देण्यात बजावत असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यात आली आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी 25,000 हून अधिक एमएसएमईचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला. (MSME – Ministry of Micro, Small and Medium Enterprises)
11.5 ट्रिलियन डॉलर्सची गरज
देशाची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 30 ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचविण्याचे भारताचे ध्येय आहे, म्हणजे दोन दशकांत ८ पट वाढ. भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी)मध्ये आपले योगदान नोंदवणारे एमएसएमई उद्योग हे तिसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र आहे. एमएसएमई उद्योगाची लक्षणीय वाढ होण्यासाठी अचल मालमत्तेमध्ये (फिक्स्ड असेट) अंदाजे 11.5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सच्या वित्तपुरवठ्याची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
एमएसएमईशी संबंधित अहवालानुसार एमएसएमई व्यवसायाबाबत 2022 पासून सकारात्मकता सर्वोच्च पातळीवर पोहोचलेली आहे. अतिशय कठीण परिस्थितीही या उद्योगांनी चांगली कामगिरी केली आहे. एमएसएमईच्या कर्ज घेण्याच्या संभाव्यतेतही सुधारणा झाली आहे. सरकारकडून अनेक नियमांत सुधारणा केली गेल्याने या उद्योगांच्या पत प्रवेशाला चालना मिळाली आहे.
एमएसएमईच्या कामगिरीत सुधारणा
भारताचा जीडीपी सातत्यपूर्ण दराने वाढत असून, हा दर जुलै-सप्टेंबर 2023 दरम्यानच्या तिमाहीत अंदाजे 7.6 टक्के असून, हा अपेक्षेहून अधिक आहे. संपूर्ण वित्तीय वर्षाकरिता अर्थव्यवस्थेत 7.3 टक्के वाढ नोंदविली गेली आहे. महामारीनंतर मोठ्या कंपन्यांपेक्षा मंद गतीने, तर लहान संस्थांमध्ये चांगली वाढ दिसून आली. 10 कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त उद्योगांनी उच्च उलाढाल असलेल्या संस्थांच्या तुलनेत 10 टक्क्यांपेक्षा अधिक वार्षिक वाढ नोंदवली आहे. (MSME – Ministry of Micro, Small and Medium Enterprises)
महामारीच्या वर्षात व्यवसाय आणि विक्रीत घसरणीनंतर पहिल्या वर्षी 77 टक्के ग्राहकांनी पुन्हा आपले कामकाज सुरू केले, तर 68 टक्क्यांपेक्षा जास्त उद्योगांनी महामारीनंतर दुसऱ्या वर्षात 10 टक्के वार्षिक विक्रीवाढ साध्य केली. परिणामी, एमएसएमई उद्योगांतील जोखीम पातळी कमी झाली आहे. त्यामुळे एमएसएमईद्वारे कर्ज घेण्याची संभाव्यतेतही सुधारणा झाली.
एमएसएमईची पतस्थिती
सन 2020 पासून उद्यम मंचावरील एमएसएमई नोंदणी 2.4 पट वाढली आहे. आर्थिक वर्ष 23 पर्यंत त्यांनी रोजगाराच्या 1.6 पट अधिक संधी निर्माण केल्या आहेत. सुमारे 10,000 हून अधिक सूक्ष्म आकाराच्या एमएसएमईंचा पतप्रवेश वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यातून लवचिकता आणि कर्जदारांचा सकारात्मक दृष्टिकोन दिसतो. (MSME – Ministry of Micro, Small and Medium Enterprises)
पतनिर्मितीला अधिक वाव
इतर आशियाई देशांच्या तुलनेत एसएमईसाठी भारतात पतप्रवेश 52 टक्के असून हा विस्तार चीन, दक्षिण कोरिया, व्हिएतनामच्या तुलनेत सर्वात कमी आहे. केंद्र, राज्य सरकारच्या विविध प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रोत्साहनांद्वारे एमएसएमईसाठी पतनिर्मिती होत आहे. वाढत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लहान संस्था त्यांच्या व्यवसायाच्या प्रमाणाच्या तुलनेत अधिक कर्ज घेताना दिसत आहेत. कर्जवाटपात महाराष्ट्र, गुजरात आणि नवी दिल्ली आघाडीवर आहेत. लाइट इंजिनिअरिंग, हॉस्पिटॅलिटी आणि हेल्थकेअर या क्षेत्रांनी सर्वाधिक कर्ज घेतले आहे.
अहवालातील ठळक मुद्दे
– उद्यमच्या स्थापनेपासून, एमएसएमई नोंदणीमध्ये २०23 पर्यंत 2.4 पट वाढ झाली असून, रोजगारात 1.6 पट अधिक संधी निर्माण झाल्या आहेत. (MSME – Ministry of Micro, Small and Medium Enterprises)
– सध्या जागतिक आर्थिक मंदी असूनही, लहान व्यवसायांबाबतची आशावाद पातळी 2023 च्या चौथ्या तिमाहीत शिखरावर आहे. ही पातळी 2022 नंतर सर्वाधिक आहे.
– 2019 च्या तुलनेत 2022 मध्ये एमएसएमईसाठी जोखीम कमी झाली आहे.
– महामारीपूर्व काळाच्या तुलनेत आर्थिक वर्ष 23 मध्ये एमएसएमई कंपन्यांना एससीबी, एनबीएफसीकडून पतपुरवठा वाढला आहे.