Latest

Rod Marsh: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रॉड मार्श यांचे निधन

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू रॉड मार्श (Rod Marsh) यांचे नुकतेच निधन झाले. ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मार्श हे कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारे पहिले ऑस्ट्रेलियन विकेटकीपर होते. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शुक्रवारी (दि. 4) ॲडलेड रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

मार्श यांनी इंग्लंडविरुद्धच्या 1970-71 च्या ॲशेस मालिकेतून कसोटीतून क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 1984 च्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीनंतर निवृत्त झाले. 5 जानेवारी 1971 रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि फेब्रुवारी 1984 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 92 वा वनडे सामना खेळला.

वेगवान गोलंदाज डेनिस लिली आणि मार्शची जोडी खूप प्रसिद्ध होती. या दोघांनी मिळून कसोटी क्रिकेटमध्ये 95 विकेट्सचा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या अप्रतिम संघासाठीचं त्याचं मोलाचं योगदान होतं. संघासाठी त्यांनी ज्याप्रकारे खेळी केली आणि प्रेक्षकांना जो आनंद दिला ते रॉड मार्श नेहमीच लक्षात राहतील अशी प्रतिक्रिया क्रिकेटच्या चाहत्यांनी दिली आहे.

कसोटीत शतक झळकावणारा पहिला ऑस्ट्रेलियन विकेटकिपर

डावखुरे फलंदाज मार्श हे कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारे पहिले ऑस्ट्रेलियन विकेटकिपर होते. त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख म्हणून कारकीर्द सांभाळली. त्याचबरोबर ते दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या जागतिक कोचिंग अकादमीचे पहिले प्रमुख होते. 2014 मध्ये त्यांची ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. दोन वर्षे ते या पदावर कार्यरत होते.

1985 मध्ये ऑस्ट्रेलिया हॉल ऑफ फेममध्ये रॉड मार्श यांचा समावेश करण्यात आला. यांच्या निधनानंतर हॉल ऑफ फेमचे चेअरमन जॉन बर्ट्रांड म्हणाले की, मार्श हे उत्तम रणनीती खेळ खेळायचे. 'कॅच मार्श, बोल्ड लिली' ही त्यांची संज्ञा लोककथा बनली. क्रिकेट जगतात नावारुपास आलेल्या या महान खेळाडूला अखेरचा सलाम.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT