Latest

COVID19 | देशातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या (COVID19) संख्येत गेल्या दोन दिवसांपासून घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २,५६८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २० जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २,९११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात कोरोनाचे १९,१३७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

याआधी रविवारी दिवसभरात ३ हजार १५७ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, २६ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान २ हजार ७२३ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. सोमवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७४ टक्के, तर दैनंदिन कोरोनासंसर्गदर १.०७ टक्के नोंदवण्यात आला होता. यापूर्वी दोन दिवसांच्या आकडेवारीवर दृष्टीक्षेप टाकल्यास सोमवारी दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख मंदावल्याचे दिसून आले. २९ एप्रिल रोजी ३,६८८, ३० एप्रिलला ३ हजार ३२४ तर, १ मे रोजी ३ हजार १५७ कोरोनाबाधित आढळले होते.

देशात कोरोनाविरोधात (COVID19) सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८९ कोटी ४१ लाख ६८ हजार २९५ डोस देण्यात आले आहेत. यातील २.९१ कोटी डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले आहेत. खबरदारी म्हणून आतापर्यंत २ कोटी ८३ लाख ६९ हजार ७०० बूस्टर डोस देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ३० लाख ५७ हजार ५६५ डोस पैकी १९ कोटी १२ लाख ७९ हजार ६३५ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ८३ कोटी ८२ लाख कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत.यातील २ लाख ९५ हजार ५८८ तपासण्या रविवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.

दिल्ली सरकारकडून कोरोना रुग्णांसाठीच्या बेड संख्येत वाढ

देशाच्या राजधानीतील कोरोना संख्येत वेगाने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने कोरोना रुग्णांसाठीच्या बेड संख्येत वाढ केली आहे. लोकनारायण जयप्रकाश रुग्णालयात (एलएनजेपी) दाखल होणार्‍या कोविड रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत ८० टक्क्याने वाढ झाली आहे. एलएनजेपी रुग्णालयाची एकूण बेड क्षमता दोन हजार इतकी आहे. कोरोनाच्या याआधी आलेल्या तीन लाटांवेळी या इस्पितळात मोठ्या संख्येने रुग्ण भरती झाले होते.

पहिली लाट आली तेव्हा म्हणजे २०२०२ साली सर्वप्रथम हेच इस्पितळ कोरोना उपचार रुग्णालय म्हणून जाहीर करण्यात आले होते. एलएनजेपीमधील कोविड खाटांची संख्या अडीचशेवरुन ४५० पर्यंत वाढविण्यात आली आहे. दुसरीकडे या रुग्णालयातील आयसीयू बेड्सची संख्या १०० वरुन १७८ पर्यंत वाढविण्यात आली आहे. मागील चोवीस तासात दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत १,४८५ ने वाढ झाली होती. दिल्लीतील सक्रियता दर ४.८९ टक्के इतका आहे. ताज्या आकडेवारीनुसार दिल्लीत आतापर्यंत १८ लाख ८४ लाख ५६० लोकांना कोरोनाची बाधा झाली असून या विषाणूने २६ हजार १७५ लोकांचा बळी घेतलेला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT