पुढारी ऑनलाईन डेस्क : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वधेरा यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ते म्हणाले की, "यूपीच्या प्रभारी लोकांनी एकाच वेळी दोन्ही कामे करण्याचा प्रयत्न केला. हे दोन्ही एकाचवेळी होणारे नव्हते. उत्तर प्रदेशच्या पक्ष नेतृत्वाला एकाचवेळी निवडणूक आणि पक्षाची पुनर्बांधणीसंदर्भात सावध केले होते. प्रथम पक्षाची पुनर्बांधणी करा, अशीही सूचना केली होती, परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे माझ्यासह पक्षातील ज्येष्ठांचेही मत आहे.
मुलाखतीत पी चिदंबरम म्हणाले, "यूपीमध्ये, गेल्या काही वर्षांत पक्ष कोरडा झाला आहे, हे आपल्याला सर्वांना माहितच आहे." पक्षाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील पराभवासाठी गांधी कुटुंबाला जबाबदार धरता येणार नाही, यावरही त्यांनी भर दिला. ते म्हणाले की, "यूपीच्या प्रभारी लोकांनी एकाच वेळी दोन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. पहिली, पक्षाची पुनर्बांधणी करणे आणि निवडणूक लढवणे. मी त्यांना बजावले होते की, दोन्ही एकाच वेळी होऊ शकत नाहीत. पक्षाची आधी पुनर्बांधणी झाली पाहिजे." आणि यानंतर निवडणुकीचे काम हातात घेता येऊ शकते, पण दुर्दैवाने पक्षाची पुनर्बांधणी आणि निवडणूक लढाई एकाच वेळी झाली.
ते पुढे म्हणाले, "पक्षात गंभीर कमतरता आहेत, ज्या वेळोवेळी मी आणि (कपिल) सिब्बल आणि (गुलाम नबी) आझाद या पक्षातील जाणकारांनी निदर्शनास आणल्या आहेत. म्हणूनच आम्हाला वाटते की, प्रथम या संघटनात्मक कमकुवतपणा दूर करावा लागेल .आझाद आणि सिब्बल हे G-23 नावाच्या असंतुष्ट नेत्यांमध्ये आहेत. त्यांनी दोन वर्षांपूर्वीच मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक बदल आणि जबाबदार नेतृत्वाची गरज असल्याचे संकेत दिले होते, तरीही पक्षातील ही कमतरता आजही आहे तशीच आहे.
पराभवानंतर काँग्रेस G-23 नेत्यांच्या नियमित बैठका घेण्यात येत आहेत. पक्षात संभाव्य फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु पक्ष फुटू नये म्हणून चिदंबरम म्हणाले, "माझे त्यांना आवाहन आहे की, त्यांनी आपापल्या मतदारसंघात परत जाऊन पक्षाची पुनर्बांधणी करावी." गांधी घराण्याने पराभवाची जबाबदारी स्वीकारली यावर जोर देऊन चिदंबरम म्हणाले की त्यांनी गोव्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तर, इतरांनीही आपआपल्या ब्लॉक, जिल्हा, राज्य आणि AICC (अखिल भारतीय काँग्रेस कमिटी) स्तरावरील पक्षाच्या पुनर्बांधणीची जबाबदारी स्वीकारावी असेही त्यांनी सांगितले.
प्रियांका गांधी वधेरा यांच्यावर चार वर्षांपूर्वी तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये पक्षाच्या पुनर्बांधणीची जबाबदारी सोपवली होती. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन्ही करण्याबाबत त्या उघडपणे बोलत होत्या. उत्तर प्रदेशात काँग्रेसला १९८९ सातत्याने पराभावाचा सामना करावा लागला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्षाचा अक्षरश: सफाया झाला आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या सातपैकी पाच जागाही आत्ताच्या निवडणुकीत त्यांनी गमवल्या आहेत. उत्तर प्रदेशात आता पक्षाची मते फक्त 2.4 टक्क्यांवर आली आहेत.