Latest

Lok Sabha Election : पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसची तीन जागांवर नजर

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या दहा जागांपैकी तीन जागांवर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे. इंडिया आघाडीच्या जागा वाटपात पुणे, सांगली आणि सोलापूर या तीन जागा लढविण्याकडे काँग्रेसचा कल असल्याचे पुण्यातील बैठकीत दिसून आले. लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने काँग्रेसचे नेते विभागवार बैठका घेत आहेत.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्याची तयारी म्हणून काँग्रेसने पक्षांतर्गत आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रदेशातील नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या दहा जागा, विधानसभा निवडणुका तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी यांचा आढावा घेण्यासाठी पुण्यात रविवारी बैठक घेतली. सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ही बैठक झाली.

प्रत्येक जिल्ह्यातील ब्लॉक पातळीपर्यंतच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली. तेथील पूर्वीचे मतदान, सध्याची स्थिती, मतदारसंघातील मित्र पक्षांची, विरोधकांची ताकद, पक्षांतर्गत गटबाजी यांची माहिती त्यांनी घेतली. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप होणार असून, त्यात जिंकून येण्याची क्षमता असलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्याचे ठरले आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन खासदार असून, ते सध्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आहेत. शिवसेनेचे तीन खासदार असून, तिघेही सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. भाजपकडे उर्वरित चार जागा आहेत.

पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांची नावे चर्चेत आहेत. सोलापूरमध्ये माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे या काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. सांगलीमध्येही काँग्रेस इच्छुक आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यांच्या बारामती, शिरूर आणि सातारा या तीन मतदारसंघांसह आणखी दोन ते तीन जागा जाण्याची शक्यता आहे. कोल्हापूरच्या जागा आपल्याकडे घ्याव्यात, अशी मागणी तेथील काँग्रेसच्या नेत्यांनी कालच्या बैठकीत प्रदेशातील नेत्यांकडे केली. शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसही तेथील जागांवर, पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे सध्या तरी भाजपकडे असलेल्या चार जागांवरच काँग्रेसने लक्ष दिल्याचे दिसून आले.

पक्षापेक्षा कोणीही नेता मोठा नाही…

पटोले म्हणाले, की पक्षापेक्षा कोणीही नेता मोठा नाही. त्यामुळे सर्वांनी पक्षाच्या बैठकीला, कार्यक्रमाला उपस्थित राहिले पाहिजे. जागा महाविकास आघाडीपैकी कोणत्याही पक्षाला मिळाली, तरी त्यांच्या विजयासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये फूट पडल्यानंतर, प्रत्येक जिल्ह्यात काय बदल झाले आहेत, या पक्षांच्या कोणत्या गटाची किती ताकद आहे, याची काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी तपशीलवार माहिती घेतली. काँग्रेसची संघटनात्मक बांधणी, त्यातील अडचणी, पक्षाला जागा मिळाल्यास संभाव्य उमेदवार याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT