कोल्हापूरची हद्दवाढ होणारच; आंदोलन करून वेळ वाया घालवू नका : पालकमंत्री हसन मुश्रीफ | पुढारी

कोल्हापूरची हद्दवाढ होणारच; आंदोलन करून वेळ वाया घालवू नका : पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय विकास होणार नाही. त्यामुळे कोणत्याही स्थितीत शहराला संलग्न गावांची हद्दवाढ होणारच. त्यासाठी वेगळा प्लॅन आहे. मनपाने सादर केलेली सर्व 18 गावे आणि दोन एमआयडीसी या सर्वांचा हद्दवाढीत समावेश होणार नाही. सणासुदीच्या दिवसांत ग्रामस्थांनी आंदोलन करून वेळ वाया घालवू नये, असा टोला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिकेत पत्रकार परिषदेत लगावला.

मुश्रीफ यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत येत्या दहा महिन्यांत कोल्हापूरची हद्दवाढ करणार, असे जाहीर केल्यानंतर 20 गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांची बैठक झाली. त्यात हद्दवाढीला विरोध म्हणून येत्या गुरुवारी (दि. 12) सर्व गावे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी कोल्हापूरसह संबंधित गावांत तणावाचे वातावरण आहे.

त्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील बैठकीनंतर पत्रकारांनी पालकमंत्री मुश्रीफ यांना हद्दवाढीविषयी विचारले. ते म्हणाले, शहराला लागूनच काही गावे आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठ्यासह इतर सवलतींचा लाभ ती गावे घेत आहेत. भौगोलिक संलग्न असल्याने शहरासारखाच त्यांच्या जमिनीलाही भाव मिळतो. अशा गावांचा प्राधान्याने हद्दवाढीत समावेश केला जाईल. हद्दवाढीला विरोध असलेल्या गावातील लोकप्रतिनिधींशी नंतर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ प्रमुख उपस्थित होते.

Back to top button