Latest

Israel Hamas war | चीनने डिजिटल नकाशांमधून इस्रायलला हटवले, काय कारण?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : गाझामधील संघर्ष आणखी तीव्र झाला असतानाच चीनने त्यांच्या डिजिटल नकाशांमधून इस्रायलला हटवल्याचे वृत्त समोर आले आहे. चिनी टेक कंपन्या बायडू (Baidu) आणि अलीबाबा (Alibaba) यांनी त्यांच्या सिस्टममधून इस्रायलला एक राष्ट्र म्हणून हटवले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने याबाबतचे वृत्त प्रथम दिले होते. (Israel Hamas war)

संबंधित बातम्या

वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, Baidu वरील डिजिटल नकाशे इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील सीमा दर्शवतात. परंतु त्यात देश म्हणून त्यांचा उल्लेख दिसत नाही. अलीबाबाच्या नकाशामध्ये हेच दिसून आले आहे. त्यांनी "लक्समबर्ग सारखे लहान देश देखील अगदी स्पष्टपणे चिन्हांकित केले आहेत. चीनमधील ऑनलाईन नकाशात जॉर्डन, इजिप्त हे इस्रायलच्या शेजारील देश दाखवले आहेत. पण त्यात इस्रायलचे नाव दिसत नाही.

इस्रायलला नकाशांमधून का हटवले आहे? याबद्दल चिनी कंपन्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण या संदिग्धतेमागची कारणे इस्रायल-हमास युद्धाबाबतच्या चीनच्या अस्पष्ट भूमिकेशीही जोडली गेली आहेत. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि इस्रायलचे परराष्ट्र मंत्री इली कोहेन यांच्यातील फोनवरील संवादादरम्यान चीनने ७ ऑक्टोबर रोजीच्या हमास हल्ल्यानंतर इस्रायलचा स्वतःचा बचाव करण्याच्या अधिकाराचे समर्थन केले होते. पण, परराष्ट्रमंत्र्यांनी पुनरुच्चार केला की आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याच्या मर्यादेत स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

जेव्हा ७ ऑक्टोबर रोजी इस्रायल-हमास युद्ध सुरू झाले तेव्हा चीनने हमासच्या हल्ल्यांचा जाहीर निषेध केला नाही. परंतु शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी दोन्ही बाजूंना तातडीने प्रयत्न करण्यास सांगितले होते. चीनने स्वतंत्र पॅलेस्टिनी राष्ट्राची निर्मिती हाच या संघर्षावर एकमेव उपाय असल्याचा सल्ला दिला होता. (Israel Hamas war)

इस्रायल-हमास युद्ध २५ व्या दिवशीही सुरु

इस्रायल-हमास युद्ध ७ ऑक्टोबर २०२३ रोजी सुरू झाले, जेव्हा हमास दहशतवादी गटाने इस्रायलवर अचानक हल्ला केला. यात १,४०० इस्रायली ठार झाले आणि सुमारे २०० लोकांना ओलीस ठेवले. तेव्हापासून इस्रायलने गाझावर हल्ले करत वेढा दिला आहे. तसेच सातत्याने बॉम्बफेक सुरू आहे. ७ ऑक्टोबरपासून गाझा पट्टीत सुरु असलेल्या इस्रायली हल्ल्यांमुळे ८ हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT